(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kirit Somaiya : Kirit Somaiya : सोमय्यांनी स्वत:ची बाजू मांडली; मात्र एकही उत्तर न देता उठून गेले, गाडीच्या काचा ओढत थेट ईडी कार्यालयाकडे रवाना
मी दमडीचाही घोटाळा केला नाही. त्यामुळं मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले.
Kirit Somaiya : विक्रांत प्रकरणी एक रुपयाचाही घोटाळा झाला नाही. मी दमडीचाही घोटाळा केला नाही. त्यामुळं मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले. संजय राऊत यांनी आरोप केले पण अद्याप ते कोणत्याही प्रकारचा पुरावा देऊ शकले नाहीत. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. मात्र, प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. सोमय्या थेट जरंडेश्वर कारखाना प्रकरणी शेतकऱ्यांसोबत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.
एफआयआर दाखल केले आहे, पण मला अद्याप एफआयआरची प्रत मिळाली नसल्याचे सोमय्या म्हणाले. माझे उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की, त्यांच्याकडे असणारी माहिती त्यांनी द्यावी, मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. मी चौकशीला तयार असल्याचे सोमय्या म्हणाले. पोलिसांच्या कोणत्याही चौकशीचे मी स्वागत करत असल्याचे सोमय्या म्हणाले. दरम्यान, ठाकरे सरकारचे घोटाळे मी बाहेर काढत आहे आणि पुढेही काढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत काय म्हणाले होते?
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी लोकांकडून जमा केलेला निधी किरीट सोमय्यांनी हडप केला आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्यांचा असा अपमान करणाऱ्या किरीट सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चार जोडे हाणले पाहिजे अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेला निधी किरीट सोमय्या यांनी हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. राज्यपाल कार्यालयाकडून आलेल्या माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा आरोप केला. त्यानंतर आता शिवसेना-भाजप राजकीय संघर्ष आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, सोमय्या यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या अपमान केला असून त्यांची कृती देशद्रोहीपणाची आहे. मात्र, देशभक्तीचे गीत गाणारे, देशभक्तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणाऱ्यांची बाजू घेतली. फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय गोळवलकर गुरुजी, देवरस, रज्जू भैय्या, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल. मोहन भागवत यांनादेखील वाईट वाटत असेल असेही राऊत यांनी म्हटले. आयएनएस विक्रांतच्या या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. आयएनएस विक्रांतसाठी देशभरातून पैसे जमा केले.