Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनचा वाढता धोका, कशी घ्याल जनावरांची काळजी? वाचा सविस्तर
जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहे. त्यामुळं पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
Lumpy Skin Disease : गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढू लागला आहे. त्यामुळं पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन त्यांची योग्य सुश्रुषा करणे गरजेचे आहे. 20 टक्के औषधोपचार आणि 80 टक्के सुश्रुषा या सुत्रानुसार लम्पी चर्मरोगावर मात करता येते. पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घेऊन उपचार घेतल्यास लम्पी चर्मरोगापासून पशुधन वाचवण्यात यश मिळेल, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलीय.
आहारविषयक काळजी
रोगी जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे जनावरांचा आहार व पाणी पिणे उच्चतम राहील यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी. आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा प्रथिने व ऊर्जायुक्त खुराक (ढेप/ मका आदी) द्यावा. पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात वारंवार उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात. तसेच त्यांना खनिजक्षार व ऊर्जा मिळेल. थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहिल्यास अत्यवस्थ जनावरसुद्धा तंदुरुस्त होते.
ज्या बाधित जनावरांना मान, पाय, छातीवरील सुजेमुळे मान खाली करता येत नाही, अशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. गरजेप्रमाणे चारा हाताने खाऊ घातल्यास रोगी जनावर चारा खात असल्याचे दिसून आले आहे.
पूरक खाद्यपदार्थांचा अंतर्भाव
आजारी जनावरांनी चारा खाने कमी केले असेल तर अशा जनावरांना ऊर्जावर्धक (प्रोपायलीन, ग्लायकॉल) औषधे तोंडावाटे देण्यात यावीत. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे जीवनसत्वे, खनिजक्षार मिश्रण, प्रतिकारशक्ती वर्धक तसेच यकृतवर्धक औषधे देण्यात यावीत. रक्तशय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळी, संध्याकाळी किमान 21 दिवस देण्यात यावीत. ओटीपोटातील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्रि व प्रोबायोटिक औषधे त्याचप्रमाणे भूक वाढीसाठी औषधे देण्यात यावीत.
जनावरांना कोरडा आणि ऊबदार निवारा करा
जनावरांचे पाऊस आणि थंडीपासून संरक्षण करावे. जनावरे उघड्यावर बांधू नयेत. जनावरांना योग्य तो कोरडा आणि ऊबदार निवारा उपलब्ध करुन द्यावा. त्यांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करावे. लहान वासरांना अंगावरती ऊबदार कपडे पांघरावीत. गोठ्यात अधिक वॅटेजचे बल्ब लावावेत जेणेकरुन उष्णता निर्माण होईल. प्रतिकूल वातावरणामुळं येणारा ताण टाळता येईल.
पोळी पायावरील सुजेवर शेक देणे
ज्या जनावरांना पाया समोरील लसीका ग्रंथीवर, पायावर किंवा छातीवर सूज आहे, अशा जनावरांना बसताना त्रास होतो म्हणून ती कित्येक दिवस उभी राहतात. अशा जनावरांना मीठाच्या संतृप्त गरम द्रावणाचा सुती कापडाच्या सहाय्याने दिवसातून 2 वेळा उत्तम शेक द्यावा. तसेच मॅग्नेशियम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लीसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते. अंगावरील गाठी आणि सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळेत गरम पाण्याची अंघोळ (शेकत / अंग चोळत) घालावी आणि अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही. लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करण्यास अवघड झाल्याने दुध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने दिवसातून 2 वेळा शेक द्यावा. बसून राहणाऱ्या जनावरांना सिमेंट काँक्रीटची जमीन टाळावी. अंगाखाली मऊ गवत / तुसाची गादी करावी. अशा बसून राहणाऱ्या जनावरांना दर दोन तीन तासांनी बाजू बदलावी. दिवसातून दोन वेळा मदतीने उभे करावे.
तोंडातील व्रणोपचार
जनावरांच्या विशेषत: लहान वासरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, तोंड पोटेशियम परम्यांगनेटच्या द्रावणाने धुवून दिवसातून तीन ते चार ळेस बोरोग्लोसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर लावावे. त्यामुळं जनावराला चारा खाण्यास, वासरांना दुध पिण्यास त्रास होणार नाही.
नाकाची स्वच्छता
लहान वासरांच्या नाकामध्ये काही वेळा अल्सर, जखमा निर्माण होतात. नाक चिकट स्त्रावांनी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट आणि कडक होतो. त्यामुळं श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्यांनी नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लोसरीन अथवा कोमट खोबरेल व बोरीक पावडरचे मिश्रण चार-चार थेंब टाकावे. जेणेकरुन मऊपणा टिकून राहील. जखमा भरुन येतील. सर्दी असेल तर निलगीरीच्या तेलाची किंवा विक्सची वाफ दिली तर चांगला फायदा होतो.
डोळ्यांची निगा
डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते व पूढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरिक पावडरच्या द्रावणाने नियमीत धुवून घ्यावेत किंवा कोमट पाण्याने साफ करावेत. रोगातून बरे झालेल्या बैलांना कामास जुंपल्यामुळे रोग प्रकोप होऊन दगावत आहेत म्हणून प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना कामास लावू नये.
जखमांचे व्यवस्थापन
बाधित जनावरांमध्ये दोन तीन आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषतः पायावरती जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून जखमा होतात. त्या जखमांवर उपचार करावा. यामध्ये जखमा 0.1 टक्के पोटेशियम परम्यागनेटच्या द्रावणाने धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्होडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे. त्यानंतर जखमेवर मॅग्नेशियम सल्फेट व ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळुवारपणे बांधावी. जखमांवर माश्या आणि इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखम परिसरात फवारण्यात यावा. जखमेमध्ये अळ्या पडल्यास अशा जखमेत टर्पेंटाईनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा आणि त्यानंतर मृत अळ्या बाहेर काढून घ्याव्यात. अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारण्यात यावा. जखमा जास्त खोल व दुषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन पिरॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावा. जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे.
गोमाशांचा त्रास कमी करण्यासाठी औषधांची फवारणी
जनावरांच्या अंगावर जखमा झाल्यानं माश्या बसतात, त्यामुळं जनावरे त्रस्त होतात. रोगी जनावरांना गोचीड-गोमाश्या यांचा त्रास कमी होण्यासाठी गोठ्यात दर तीन ते चार दिवसांनी कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी. तसेच अंगावरती हर्बल आणि वनस्पतीजन्य कीटकनाशक औषधांचा नियमित वापर करावा. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये 10 मिली निंबोळी तेल, 10 मिली करंज तेल, 10 मिली निलगीरी तेल आणि 2 ग्रॅम अंगाचा साबण मिसळावे व हे मिश्रण फवारणीसाठी वापरावे.
महत्त्वाच्या बातम्या: