एक्स्प्लोर
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी यवतमाळमध्ये आज ही घोषणा केली. तसंच संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा स्वीकारल्याचंही त्यांनी सांगितलं.
![आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार Inauguration of the Sahitya Sammelan at the hands of Farmer suicide victim widow आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/10171413/akhil-web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
यवतमाळ : वादग्रस्त ठरलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक प्रकरणाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. कारण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी यवतमाळमध्ये आज ही घोषणा केली. तसंच संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा स्वीकारल्याचंही त्यांनी सांगितलं. अशावेळी उपाध्यक्षच महामंडळाचे काम पाहणार आहेत. हे संमेलन सर्वांचं असून, यात सहभागी होण्याचं आवाहन विद्या देवधर यांनी केलंय.
येरावार यांचे साहित्य महामंडळाकडे बोट
नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याबाबतचे सर्व आरोप संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी फेटाळले आहेत. निमंत्रणाच्या वादावर येरावार यांनी नाव न घेता साहित्य महामंडळाकडे बोट दाखवलंय. तर संमेनलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. यवतमाळचे पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले मदन येरावार यांनी आज संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. नयनतारा यांच्या निमंत्रणाच्या वादावरुन अनेक साहित्यिक आणि विचारवंतांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अशा सर्वांना येरावार यांनी संमेलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस झाली होती
नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून आता तीन नवीन नावं सुचवली होती. प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ या तिघांची नावं यवतमाळ आयोजन समितीनं सुचवली होती. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजन समितीला पत्र पाठवून नवीन उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचं आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून तीन नावं सुचवली. यवतमाळ मराठी साहित्य संमेलन बाबत निमंत्रण संस्थांमधील अनेकांनी न येण्याचा निर्णय घेण्याची चळवळ सुरू झाली. त्या परिस्थितीतमध्ये निमंत्रक संस्थाची भूमिका काय आहे ते तातडीने कळवावे तसेच उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे ते सुद्धा तातडीने सुचवावे, असं पत्र साहित्य महामंडळाने यवतमाळ आयोजन समितीला पत्र पाठवलं होतं.
आयोजकांकडून नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असं साहित्य संमेलनाच्या आयोजकांनीच लेखिका नयनतारा सहगल यांना पत्र लिहून कळवलं होतं. संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी सहगल यांना पत्र लिहून आपली असमर्थता दर्शवली. संमेलनाचे उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांच्या नावाला मनसेसह शेतकरी न्याय हक्क समितीने विरोध केला होता. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका बदलली.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचं निमंत्रण आयोजकांनी रद्द केलं होत. त्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा गदारोळ माजला होता. आयोजकांकडून सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होत. त्यामुळे साहित्यिकांसह अनेक क्षेत्रातल्या लोकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. या वादानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर यांना ई-मेलने राजीनामा पाठवला. मात्र साहित्य संमेलन होईपर्यंत राजीनाम्यावर निर्णय होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. येत्या 11 जानेवारीपासून यवतमाळ येथे 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संमेलनाची सुरुवात वादाने झाली आहे. नयनतारा सहगल यांना आमंत्रण देऊन नंतर रद्द केल्यामळे अनेक मान्यवरांनी साहित्य संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच महामंडळाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. विशेष म्हणजे श्रीपाद जोशी यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील 3 महिन्यात संपणार होता. अशात साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे.
काय आहे वाद?
यवतमाळमध्ये 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 जानेवारी पासून सूरु होत आहे. या संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असे म्हणून संमेलन उधळून लावू अशी भाषा केली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले होते. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्याात आली होती. आता त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचविण्यात यावे, असे महामंडळाने आयोजन समितीला सांगितले होते. यवतमाळ आयोजन समितीने काल साहित्य महामंडळाला उद्घाटक म्हणून चार व्यक्तींची नावं सुचवली होती.
संबंधित बातम्या
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस
मराठी साहित्य संमलेन अध्यक्षा अरुणा ढेरेंना डॉ. मुणगेकरांचं खुलं पत्र
92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरेंची निवड
नयनतारा सहगल यांच्या अपमानावर विविध मान्यवरांचा संमेलनावर बहिष्कार
मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण
... तर मनसे उधळणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!
नयनतारा सहगल यांना विरोध नाही : राज ठाकरे
नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)