धक्कादायक! बुलढाणा जिल्ह्यातून सहा महिन्यात 480 जण बेपता, महिला आणि मुलींचं प्रमाण जास्त
बुलढाणा जिल्ह्यातून गेल्या सहा महिन्यात 480 जण बेपता झाल्याची माहिती समोर आली आहे. यात महिला आणि मुलींचं प्रमाण लक्षणीय आहे.
बुलढाणा : कोरोनाच्या सहा महिन्याच्या काळात बुलडाणा जिल्ह्यातून 480 जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी 173 पुरुष तर तब्बल 307 महिला व मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये 242 जणांचा शोध पोलिसांनी लावला आहे. पण अजूनही अनेकजण पोलिसांना सापडत नाहीये.
वेगवेगळ्या कारणावरून घरून न सांगता निघून जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून 2021 या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये विभिन्न वयोगटातील 480 जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे महिला व मुलींचे आहे तर बदनामी पोटी अनेकदा तक्रारी दिल्या जात नाहीत. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बेपत्ता असणाऱ्या महिलांमध्ये 18 ते 30 या वयोगटातील महिलांची संख्या ही जास्त आहे. बेपत्ता असलेल्या एकूण 480 पैकी 242 म्हणजे निम्मे लोकांचा पोलिसांनी शोध लावलाय तर इतरांचा शोध घेणे सुरू आहे.
लोकं घर सोडून का जातात?
अलीकडच्या काळात न सांगता निघून जाणे किंवा पळून जाणे याचे प्रमाण वाढले आहे. समोर आलेली शासकीय आकडेवारी हीच भुवया उंचावणारी आहे. मात्र, ही संख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला किंवा मुलगी घरून निघून गेल्यानंतर अनेक पालक बदनामी पोटी तक्रार दखलच करत नसल्याचे बोलल्या जाते. मात्र, न सांगता निघून जाणे यामध्ये महिला व मुलीच अधिक का आहे? या संदर्भात आम्ही महिला तज्ञांचं मत जाणून घेतलंय. त्यांच्यामते यासाठी दोन घटना प्रामुख्याने कारणीभूत असू शकतात. यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर तर दुसरा म्हणजे मुले आणि पालक यांच्यामध्ये दूर होत चाललेला सुसंवाद ही दोन कारणे यासाठी कारणीभूत असू शकतात.