Gujarat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात MIM उतरणार; इम्तियाज जलील यांची माहिती
Imtiyaz Jaleel On Gujarat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात MIM देखील उतरणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
Imtiyaz Jaleel On Gujarat Election : नुकतेच निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील निवडणूक (Himachal Pradesh Legislative Assembly Election) कार्यक्रम जाहीर केला असून आता सर्वांचं लक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujrat Legislative Assembly Election) घोषणेकडे लागलं आहे. भाजपचा (BJP) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये (Gujrat) काँग्रेससह (Congress) इतर पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. दरम्यान, ज्या एमआयएमवर (MIM) भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतो, तो एमआयएम पक्षसुद्धा यावेळी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, "यापूर्वी आम्ही गुजरातमध्ये महानगरपालिका निवडणूक (Gujarat Municipal Election) लढवली होती. या निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं होतं. एमआयएमला महानगरपालिकेच्या निवडणुकीत 26 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे गुजरातमधील लोकांनासुद्धा आता बदल हवा आहे. म्हणूनच आम्ही गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आत्तापर्यंत आमचे पाच उमेदवार निश्चित झाले आहे. ज्यात आमदाबाद, सुरतसह इतर तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच इतर ठिकाणचे उमेदवार सुद्धा निश्चित केले जाईल. सर्वच जागा आम्ही लढवणार नसून, ज्या ठिकाणी आमची ताकद चांगली आहे त्याच ठिकाणी आम्ही उमेदवार देणार असल्याचे सुद्धा जलील म्हणाले.
काँग्रेसचे आमदार संपर्कात...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही पक्षातील आजी-माजी आमदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती जलील यांनी दिली. तर काँग्रेस पक्षाचे काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यांच्याशी बोलणं झाले आहे. मात्र पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी याबाबत अंतिम निर्णय घेतील. त्यानुसार पक्षाची पुढची भूमिका असणार असल्याचं जलील म्हणाले. सोबतच गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आमची संपूर्ण तयारी झाली आहे. आमच्या स्टार प्रचारकांची यादी सुद्धा तयार आहे. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी,अकबर ओवेसी, माजी आमदार वारीस पठाण यांच्यासह मी स्वतः सभा घेणार असल्याचं जलील म्हणाले.
'आप' भाजपची बी टीम...
आम्हाला भाजपची बी टीम म्हणतात, पण भाजपची खरी बी टीम तर आम आदमी पार्टी आहे. आम्ही जर सर्वच जागा लढवल्या तर आम्हाला बी टीम म्हणू शकतात. मात्र जिथे आमची ताकद जास्त आहे, त्याच ठिकाणी आम्ही उमेदवार देत आहोत. ज्यावेळी भाजप अडचणीत येते तेव्हा अरविंद केजरीवाल यांना पुढे केलं जातं. त्यामुळे आम आदमी पार्टी खरी भाजपची बी टीम असल्याचा आरोपही जलील यांनी केला.