महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Hussein Dalwai : हुसेन मिस्त्रिखान दलवाई हे गेल्या 20 ते 22 वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. परंतु, राजकीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते.
Hussein Dalwai : महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री मंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे आज सायंकाळी निधन झाले आहे. 99 व्या वर्षी दलवाई यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसेन मिस्त्रिखान दलवाई हे गेल्या 20 ते 22 वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. परंतु, राजकीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते. हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचा उल्लेख सिनियर असा केला जातो. ते चिपळून मधील उक्ताडचे रहिवासी होते.
हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) हे खेड विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर 1962 पासून निवडून येत. त्यांचा जन्म चिपळूणमध्ये झाला. त्यांनी आपले लॉचे शिक्षण देखील चिपळूनमध्ये पूर्ण केले. वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले दलवाई चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असं सांगत. असे सांगत असताना ते दोन्ही तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांसोबत जिव्हाळ्याचं नातं ठेवत. खेड आणि चिपळूण दरम्यान आज जी लोटे-परशुराम ही औद्योगिक वसाहत दिसते ती दलवाई यांनी राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्याकडे हट्ट धरून मंजूर करून घेतलेली आहे. आज खेड तालुका पाण्याने समृध्द आहे. त्याला कारणीभूत ठरलेला नातूनगरचा जलप्रकल्प दलवाई यांनीच मंजूर करून घेतला आणि तालुक्यातील बराच भाग सुजलाम झाला. खेड तालुक्यात आज असलेली मध्यम व लघु धरणे दलवाई यांच्या काळात झालेली किंवा त्यांनी आखणी केलेली आहेत.
हुसैन दलवाई यांनी 1962 ते 1978 असा दीर्घकाळ महाराष्ट्र विधानसभेत खेड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. 1977 ते 1978 या वर्षी ते महाराष्ट्राचे कायदामंत्री होते. मे 1984 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली आणि राज्यसभा सदस्यत्वाचा साडेपाच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना डिसेंबर 1984 मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि त्या निवडणुकीत ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मोठा उठाव झाला. त्यासाठीच्या सर्व बैठका दलवाई यांच्या मुंबईतील ओव्हल मैदानासमोरच्या एम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी होत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते तेथे एकत्र येत. त्यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण यांच्या जागी वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात दलवाई यांना मंत्री केले. त्यानंतर बॅ. अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचेही विभाजन झाले. त्यावेळी हुसेन मिस्त्रिखान दलवाई राज्यसभेवर निवडून गेले व नंतर स्वेच्छेने निवृत्त झाले.