लॉकडाऊनमध्ये मानवतेचे दर्शन, सोलापुरात हिंदू मृत महिलेवर मुस्लीम बांधवांकडून अत्यसंस्कार
सोलापुरात पद्मावती कुलकर्णी यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन झालं. त्यांची मुलं कुणीही त्यांच्या जवळ नव्हते, कामानिमित्त ते सर्वं इतर शहरांमध्ये आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना सोलापुरात येणे शक्य नव्हते. यावेळी नई जिंदगी भागातील मुस्लीम बांधवांनी या महिलेवर अत्यसंस्कार केले.

सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात सामान्य लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. अनेकांना अन्न-पाण्यासाठी देखील हाल सोसावे लागत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. याच लॉकडाऊनमध्ये संकट ओढावलेल्यांना अनेकांनी मदतीचा हात दिल्याच्या सकारात्मक घटना देखील आपण पाहिल्या. अशीच एक सकारत्मक घटना सोलापुरात पाहायला मिळाली. लॉकडाऊनच्या काळात जाती-धर्माची भिंत ओलांडून मानवतेचे दर्शन घडवणारी घटना सोलापुरातल्या नई जिंदगी भागात घडली.
सोलापुरातल्या नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या पद्मावती कुलकर्णी यांचं वयाच्या 85 व्या वर्षी आकस्मिक निधन झालं. रात्री गुरुवारी मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी घरात मृत पद्मावती कुलकर्णी यांचे जावई आणि नात हेच होते. अशा संकटाच्यावेळी मृत पद्मावती कुलकर्णी यांचे जावई यांनी परिसरात राहणारे प्रभागाचे नगरसेवक मौलाली सय्यद यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मध्यरात्री घडलेली ही घटना आणि आपली व्यथा त्यांनी नगरसेवक मौलली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांच्यासमोर मांडली. नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी देखील त्यांना धीर देत सकाळपर्यंत अंतिमसंस्काराची तयारी केली.
वृद्ध महिलेचे सर्व नातेवाईक कर्नाटक, गुजरात इत्यादी ठिकाणी राहायला आहेत. ज्यावेळी त्यांना वृद्ध महिलेच्या निधनाची बातमी कळाली त्यावेळी त्यांच्यासमोर अंतिमसंस्कारास सोलापुरात जायचं कसं असा प्रश्न उभा राहिला. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक काळात परवानगी असली तरी इतरही अनेक अडचणीमुळे लोक प्रवास करत नाहीयेत. मृत पद्मावती कुलकर्णी यांना चार मुले आणि एक मुलगी आहे. त्यांचे चारही मुले विजयापूर, बंगळुरु, पुणे, अहमदबाद या ठिकाणी राहतात. त्यामुळे अंतिमसंस्कारासाठी कोणतेही नातेवाईक सोलापुरात पोहोचू शकणार नसल्याने नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एकत्रित केलं. सोलापुरातील नई जिंदगी भाग हा मुस्लीम बहुल भाग आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवानी एकत्र येत या वृद्ध हिंदू महिलेचे अंतिमसंस्कार पार पाडले.
यावेळी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे महिलेचे अंतिमसंस्कार मुस्लिम बांधवांनी करुन धार्मिक सहिष्णुतेचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. नगरसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नगरसेवक मौलाली सय्यद यांची सोलापुरात रुग्णसेवक म्हणून ख्याती आहे. कोरोनाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा काम करत आहेत. यावेळी अनेक लोक काळजीपोटी घरात आहेत. मात्र अशा परिस्थित देखील बाबा मिस्त्री यांनी आपली रुग्णसेवा कायम ठेवली आहे. सोलापुरात कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास बाबा मिस्त्री त्यांच्या अडचणीच्या काळात धावून जातात. कोरोनासंदर्भात रुग्ण असतील तरी त्यांची योग्य मदत करतात. नॉन कोव्हिड रुग्णांना अनेक वेळा खासगी रुग्णालय उपचार देत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. अशावेळी बाबा मिस्त्री या रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून प्रशासकीय पातळीवर आवाज उठावून रुग्णांना मदत करताना दिसत आहेत.
कोरोनामुळे अनेक लोक मृतांच्या अंतिम संस्काराला येण्यासाठी देखील घाबरत आहेत. एका माणसाच्या मयतीला जाण्यासाठी, रुग्णांच्या मदतीसाठी जाण्यासाठी लोक जात नाहीत. मात्र सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण हे रुग्णांची मदत करत असल्याची भावना या वेळी नगरसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांनी यावेळी व्यक्त केली.
























