HSC Result : फोटोकॉपी अन् गुणांची पडताळणी कधीपासून? नापास झालेल्यांना पुन्हा कधी परीक्षा देता येणार? बोर्डानं सांगितलं....
HSC Result 2022 Date : बुधवारी बारावीचा निकाल लागल्यानंतर फोटोकॉपी अन् गुणांची पडताळणी कधीपासून करता येणार आणि त्यासंबंधी इतर महत्त्वाचे निर्देश बोर्डाने दिले आहेत.
मुंबई: बारावीचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. एबीपी माझाच्या संकेतस्थळावर बारावीचा निकाल आपल्याला पाहता येणार आहे. या निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिर्वार्य विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयामध्ये मिळालेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत शुक्रवार दिनांक 10 जून ते सोमवार दिनांक 20 जून अशी असेल.
फोटोकॉपी कधी मागवता येणार?
तसेच या निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी बोर्डाकडून मागवता येणार आहेत. त्यासाठीची मुदत ही शुक्रवार दिनांक 10 जून ते बुधवार दिनांक 29 जून अशी असणार आहे. वरील दोन्ही अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. हा अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजे क्रेडिट वा डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरावं लागणार आहे.
बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी सर्वप्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिर्वार्य आहे. ही छायाप्रत घेतल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्म्यूल्यांकन करायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा कधी संधी?
फेरपरीक्षार्थींसाठी (Repater) जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी शुक्रवार दिनांक 10 जूनपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्या बाबतचे परिपत्रक स्वतंत्र्यपणे काढण्यात येणार आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका या त्यांच्या महाविद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक 16 जून दुपारी 3 वाजता देण्यात येतील.
बारावीच्या निकालाची धाकधूक उरी असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची बातमी. बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 08 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.