गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी पदभार स्वीकारला, प्रशासकीय कामात हस्तक्षेप होणार नसल्याची दिली ग्वाही
राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांचे आभार मानले.
मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कठीण काळात गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलीस दलाचे सक्षमीकरण करणे ही महत्वाची बाब आहे. स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील. तसेच प्रशासकीय कामात माझ्याकडून हस्तक्षेप होणार नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
एकीकडे कोरोनाचं संकट असताना याच महिन्यात गुढी पाडवा आहे, रमजान आहे, महावीर जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे. प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा असतात. कोरोनाचा अंदाज पहिला तर या महिन्यातील परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे. गृह विभागाकडून महिलांनाही मोठ्या अपेक्षा असतात. त्या देखील पूर्ण करण्याचा पोलीस दलाकडून प्रयत्न केला जाईल, असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं.
शरद पवारांचे मानले आभार
गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रथम शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांचे आभार मानले. त्यांनी विश्वासाने जबाबदारी टाकली आहे, ती जबाबदारी पार पाडण्याचं काम करायचं आहे. काम अवघड आहे, आव्हानात्मक आहे, पण ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न राहील, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार
मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा जो निर्णय दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार आहे. तसेच एनआयए आणि सीबीआय चौकशीला सरकार पूर्ण सहकार्य करेल, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार?
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ठरलेल्या सिस्टमनुसार होतील
पोलील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात जी सिस्टम ठरलेली आहे, त्यानुसार काम होईल. वेगवेगळ्या स्तरावर बदल्यांसाठी विविध अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले असतात, त्यानुसार बदल्यांचे निर्णय घेतले जातील, पोलीस भरती, शक्ती कायदा, पोलिसांना घरे ही कामं प्राधान्याने करायची आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.
इतर बातम्या
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणी फैसला देताना हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?