Adar Poonawalla : 'सीरम'विरोधात केलेले दावे बदनामीकारकच, मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण; अदर पूनावालांना अंतरिम दिलासा
Adar Poonawalla Serum Institute : सीरमविरोधात केलेले दावे बदनामीकारकच असून समाज माध्यमांवरील विवादास्पद मजकूर तात्काळ काढून टाकण्याचे आदेश हायकोर्टाने प्रतिवादींना दिले आहेत.
Adar Poonawalla Serum Institute : कोरोनाकाळात (Coronavirus) देशासाठी वरदान ठरलेली कोव्हिशिल्ड लस (Covishield Vaccine) तसेच ती तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीबाबत बदनामीकारक वक्तव्य करण्यास हायकोर्टानं दोन प्रतिवादींना मनाई केली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात आजवर केलेल्या बदनामीकारक पोस्ट समाज माध्यमांवरून (Social Media) तात्काळ हटवण्याचे आदेशही हायकोर्टानं सोमवारी जारी केले. या याचिकाकर्त्यांना अशा आक्षेपार्ह पोस्ट करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी करत सीरम इन्स्टिट्यूटनं हायकोर्टात 100 कोटींच्या मानहानीचा दावा करत याचिका दाखल केली आहे. त्यात केलेली मागणी मान्य करत मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) अदार पुनावाला (Adar Poonawalla) आणि त्यांच्या कंपनीला अंतरिम दिलासा दिला आहे.
हायकोर्टाचा नेमका आदेश काय?
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लस आणि कंपनीविरोधात केले गेलेले हे दावे प्रथमदर्शनी बदनामीकारक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती रियाज छागला यांनी आपल्या आदेशात नोंदवलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर कोव्हिशिल्ड लस आणि सीरम या कंपनीबाबत विवादास्पद मजकूर प्रसिद्ध आणि प्रसारित करण्यास प्रतिवादींना मज्जाव केला आहे. तसेच त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट आणि कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याचेही आदेश प्रतिवादींना दिले आहेत. मात्र याबाबत सीरमनं दाखल केलेला 100 कोटींच्या मानहानीचा दावा हायकोर्टानं प्रलंबित ठेवला आहे.
काय आहे प्रकरण
'कोविशिल्ड' लस आणि कंपनीविरोधात बदनामीकारक वक्तव्य करत योहान टेंग्रा, त्याची अनार्की फॉर फ्रीडम इंडिया ही संस्था तसेच अंबर कोईरी आणि त्याची अवेकन इंडिया मूव्हमेंट ही संस्थेच्यावतीनं सोशल मीडिया पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे यांच्याविरोधात सीरमने 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. तसेच प्रतिवादींना कंपनी आणि कोव्हिशिल्डविरोधात कोणताही बदनामीकारक मजकूर कुठेही प्रसिद्ध करण्यापासून मज्जाव करण्याची मागणीही या याचेकेतून केली होती. तसेच कंपनीशी संबंधित कायदेशीर वादांबाबतही प्रतिवादींकडून चुकीचा मजकूर प्रसारित केला जात असल्याचा आरोपही कंपनीनं केला आहे.
कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरील मजकूर कोणीही कुठल्याही अटीविना पाहू शकतो, तसं असतानाही कोव्हिशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा मजकूर प्रतिवादींकडून प्रसिद्ध आणि प्रसारित केला जात असल्याचा आरोप सीरमनं याचिकेतून केला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनाही प्रतिवादींकडून लक्ष्य केल्याचा आरोप कंपनीनं केला होता.