(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला, विष्णूपुरी धरणाचे नऊ दरवाजे उघडले
Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात सोमवार सायंकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पाऊसाने ऊसंत न घेता नांदेड जिल्ह्यास झोडपून काढले.
नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरले असून लघुळ, उंद्री, तळणी, शेलगाव या गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला येणाऱ्या सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यामुळं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. इसापूर धरण 90 टक्के भरलं असून विष्णूपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, बिलोली, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, नायगाव तालुक्यातील 80 मंडळात अतिवृष्टी सह जोरदार पाऊस
नांदेड जिल्ह्यात सोमवार सायंकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पाऊसाने ऊसंत न घेता नांदेड जिल्ह्यास झोडपून काढले. आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 80 महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता दाट आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
अर्धापूर महसूल मंडळात 123 मिमीची नोंद
आज पहाटे (दिनांक 7/9/2021 रोजी) चौहीकडे पावसाच्या धारा आणि पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वाधिक अर्धापूर महसूल मंडळात 123 मिलीमीटर तर भोकर 105 मिलीमीटर, मनाठा 104 मिलीमीटर, तळणी 97 मिलीमीटर, पिंपरखेड 84 मिलीमीटर, आष्टी 77 मिलीमीटर, धर्माबाद आणि शेवडी प्रत्येकी 75 मिलीमीटर, तामसा 72 मिलीमीटर, हिमायतनगर आणि निवघा प्रत्येकी 68 मिलीमीटर, किनवट 62 मिलीमीटर, कापशी 58 मिलीमीटर, बिलोली 55 मिलीमीटर, मुखेड 52 मिलीमीटर, कलंबर 47 मिलीमीटर, नायगाव, हदगाव आणि सोनखेड प्रत्येकी 45 मिलीमीटर, कंधार आणि लोहा प्रत्येकी 40 मिलीमीटर, माळाकोळी 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरीतही मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर सध्या दिसून येत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. जिल्ह्यात 6 ते 9 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या दापोली, चिपळूणमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून जुना बाजार पुलाला पाणी लागलं आहे. तर दापोलीतील आंबेडकर चौक, जालगाव, भारतनगर, शिवाजी नगर, केळसकर नाका, नागरपुरी या ठिकाणी देखील पाणी शिरलं होतं. पण, मध्यरात्री काही काळ पावसानं विश्रांती घेतल्यानंतर या भागातील पाणी ओसरलं आहे. पण, पावसाच्या परिस्थितीकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ मात्र व्यापाऱ्यांच्या काळजीत वाढ होत आहे.