एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा कहर
महाराष्ट्रात मान्सूनने दमदार पुनरागमन केलं आहे. येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने दमदार पुनरागमन केलं आहे. येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेल्या मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस पडला असला तरी मराठवाडा मात्र अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग सुरु करणार
नाशिक शहर आणि ग्रामीण भागाला पावसाने गेल्या दोन दिवसांपासून चांगलचं झोडपून काढलं आहे. दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 72 टक्के भरलं आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आज सकाळी आठ वाजता गंगापूर धरणातून 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक : घोटी-सिन्नर महामार्ग पुढील एक महिन्यासाठी बंद
घोटी-सिन्नर महामार्ग पुढील एक महिन्यासाठी बंद राहणार आहे. मुसळधार पावसाने पुलावर मोठी भगदाडं पडली आहेत. त्याच्या दुरूस्तीसाठी महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद राहणार आहे. स्थानिकांनी अनेकवेळा पुलाच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाकडे विनंती केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता ऐन पावसाळ्यात दुरूस्तीचं काम हाती घ्यावं लागलं आहे. खरं तर मुंबईकडून शिर्डी, भंडारदाराला जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र पूल बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात पावसाचा कहर
विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला पावसाने चांगलाचं झोडपलं आहे. किशोरी गावात अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी तब्बल 260.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गाढवी नदीला पूर आल्याने किशोरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळं पाणी साचल्याने शेतीला तर अक्षरशः तलावाचं स्वरुप आलं. तर चिंचोली गावातील एक जण या पुरात वाहून गेला आहे. तर दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
माळशेज घाट वीकेंडला वाहतुकीसाठी बंद
माळशेज घाट दोन दिवस (शनिवार-रविवार) वाहतुकीसाठी बंद असेल, अशी माहिती टोकावडे पोलिस निरीक्षक धनंजय मोरे यांनी दिली. कालसुद्धा हा माळशेज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
कल्याण आणि त्यापुढील भागात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे कोणत्याही क्षणी दरड पडण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
खबरदारी म्हणून पर्यटकांनी माळशेज घाटात जाणं टाळावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. शनिवारी आणि रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली.
जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ
नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी यायला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दारणा आणि नांदूरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहचलं. जवळपास 1 टक्क्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या मराठवाड्यात पाऊस नसल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस खाली जातोय. त्यामुळे या पाण्याने दिलासा मिळणार आहे. सध्या 23 हजार 378 क्युसेक इतक्या वेगाने जायकवाडी धरणात आवक सुरु आहे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 18 टक्के इतका पाणीसाठा धरणात झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement