मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
Bhiwandi Narpoli Metro Freak Accident : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करा, जखमी प्रवाशाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली जात आहे.

ठाणे : भिवंडीतील नारपोली परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना एक रॉड वरुन खाली पडला आणि तो धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची घटना घडली. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर तब्बल पाच तास यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
भिवंडीतील नारपोली परिसरात मंगळवारी हा अपघात घडला होता. मेट्रो प्रकल्पाच्या पुलावरून कोसळलेली लोखंडी सळई थेट धावत्या रिक्षातील प्रवाशी सोनू अली यांच्या डोक्यात घुसली. या धक्कादायक घटनेनंतर तातडीने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या प्रकृती स्थिर
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू अली यांच्यावर तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. सोनू अली यांना ज्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांची परिस्थिती चिंताजनक होती. शस्त्रक्रिया केल्यानंतर सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. श्रुती शेळके यांनी सांगितले. सर्जिकल टीमने अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत ही सळई त्यांच्या डोक्यातून यशस्वीपणे बाहेर काढली.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नारपोली परिसरात मेट्रो पुलावर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान एक लोखंडी रॉड सैल झाला आणि तो थेट रिक्षामध्ये बसलेल्या सोनू अली यांच्या डोक्यात घुसला. हा प्रकार शहरात भीतीचं वातावरण निर्माण करणारा ठरला असून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या हलगर्जीपणाचा भाग मानला जातो.
नागरिकांमध्ये संताप, ठेकेदारावर कारवाईची मागणी
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, जखमी रुग्णास योग्य भरपाई मिळावी, अशीही जोरदार मागणी आहे.
सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा निष्काळजीपणा होणे अत्यंत धोकादायक आहे. प्रशासनाने यावर तत्काळ पावले उचलली पाहिजेत, असे एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण अपघातामुळे मेट्रो प्रकल्पांची सुरक्षा आणि कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसून, नागरिक आता न्यायाची मागणी करत आहेत.
या भीषण अपघातामुळे मेट्रो प्रकल्पांची कार्यपद्धती, कामगार सुरक्षेचे निकष आणि सार्वजनिक जबाबदारी यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जखमी सोनू अली यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे.























