Maharashtara Rain : पुढचे पाच दिवस कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज
पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
Maharashtara Rain : दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळं पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. पुढील 24 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य दिशेनं म्हणजेच दक्षिण छत्तीसगढच्या दिशेनं पुढे सरकणार आहे. दरम्यान, विदर्भात विजांच्या कडकडाटासह 11, 12 आणि 13 सप्टेंबर दरम्यान सर्वत्र पाऊस होणार आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
कोकणात पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट
मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संध्याकाळच्या सुमारास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर उद्यापासून पुढील तीन दिवस मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यातच आला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मच्छिमारांना देखील पुढील पाच दिवस अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर बघता, भारतीय हवामान विभागाकडून सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?
कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो. ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते. ऑरेंज अलर्टचा अर्थ त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain : आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर राज्याच्या इतर भागात यलो अलर्ट