Nitesh Rane : नितेश राणेंना दिलासा कायम; सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक नाही
आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) दिलासा मिळाला असून अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही अशी राज्य सरकारने हायकोर्टात ग्वाही दिली आहे.
Nitesh Rane : 'अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत भाजपचे आमदार नितेश राणेंना अटक करणार नाही' अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. त्यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे.
नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरूवारी दुपारी 1 वाजता न्यायमूर्ती सी.वी. भडंग यांच्यापुढे पुन्हा सुनावणी होणार आहे. बुधवारच्या सुनावणीत नितेश राणेंच्यावतीनं जेष्ठ वकील नितीन प्रधान यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता हायकोर्टाचं कामकाज सध्या दुपारी 12 ते 3 या वेळेत सुरू असल्यानं बुधवारी वेळेअभावी ही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही.
नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणघुमाळीत शिवसेनेचे कार्यकर्ते संतोश परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच आहेत असा दावा करत राज्य सरकारनं या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात विरोध केलेला आहे. 8 नोव्हेंबर 2021 ला ही घटना घडली होती. त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून सिंधुदुर्ग पोलिसांनी दोन्ही बाजूंना कणकवली पोलीस स्थानकांत बोलावलं होतं. चार तासांच्या चौकशीनंतर दोघांनाही सोडून देण्यात आलं. मात्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर पर्यावणमंत्री आदित्य ठाकरेंना 'म्याँव म्याँव' करून चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं आणि सरकारचा दबाव असल्यानं या प्रकरणात आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अटकपूर्व अर्जातून केला आहे.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आपल्याही अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. ज्यात आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत त्यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज असल्याचा राज्य सरकारचा दावा सत्र न्यायालयानं स्वीकारला होता. ज्याविरोधात नितेश राणेंसह इतरांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane : 'नितेश राणे हेच परब यांच्यावरील हल्याचे मुख्य सूत्रधार', राज्य सरकारचा हायकोर्टात आरोप
- Mumbai Coronavirus Update : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, टास्क फोर्सचा दावा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिलासा
- Omicron : तिसऱ्या लाटेचा धोका! केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्यांना पत्र, दिल्या 'या' सूचना
- नागपूरमध्ये नव्या पद्धतीनं होणार जिनोम सिक्वेसिंग, दोन दिवसांत मिळणार अहवाल