शिर्डीत आरोग्याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्या लढ्यात लक्षवेधी; आठ दिवसांत 52 हजार कुटुंबांच आरोग्य सर्व्हेक्षण
शिर्डीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा ‘प्रवरा पॅटर्न’ लक्षवेधी ठरत आहे. शिर्डी मतदारसंघात केवळ आठ दिवसांत 52 हजार कुटुबांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे.
शिर्डी : राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शिर्डी मतदार संघात मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावर नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वच विभागांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोना संकटाच्या लढ्यातील आरोग्याचा ‘प्रवरा पॅटर्न’ आता राज्यात लक्ष वेधत आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून वेळोवेळी प्रशासनाच्या मदतीने शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जागतीक पातळीवर कोरोना संदर्भातील करण्यात येणाऱ्या उपाय योजना व सुविधांचा अभ्यास करुन तज्ञांच्या मदतीने एका नियोजीत पध्दतीने कोरोना मुक्तीसाठी प्रवरा पॅटर्नची आखणी केली. यात सर्व्हेक्षण, तपासणी व रुग्णांवर उपचार या तीन बाबींकडे प्रामुख्याने लक्ष दिल जातंय. यात मतदार संघातील 241 आशा सेविकांच्या माध्यमातून 51 हजार 665 कुटुंबांचे आरोग्य सर्व्हेक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.
सर्व्हेक्षण करण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंन्फ्रारेड थर्मामिटर व ऑक्सीपल्स मिटरची उपलब्धता स्वखर्चाने करुन दिली. सर्व्हेक्षण करणाऱ्या आशा सेविकांबरोबरच आरोग्य आधिकारी, या विभागातील कर्मचाऱ्यांनाही संरक्षण किट उपलब्ध करुन दिल्याने 8 दिवसात हे सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.
कौतुकास्पद! नगर जिल्ह्यातील पहिले आदर्श गाव हिवरे बाजार अद्याप कोरोनामुक्त
प्रवरा आरोग्य पॅटर्न आरोग्य पॅटर्न राबविताना प्रामुख्याने नागरिकांनी तपासणी करताना ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे प्रामुख्याने तपासली गेली. यामध्ये 169 लोकांना असा त्रास दिसून आल्याने त्यांची पुढील तपासणी करण्यात आली. कोरोना संकटानंतर 1248 नागरीक हे बाहेरगावावरुन आले त्यांचीही आरोग्य तपासणी करुनच नियमाप्रमाणे विलगीकरण करण्यात आले. 15 फेब्रुवारी नंतर एकुण 27 लोक हे परदेशातून आले. त्यांचीही तपासणी आरोग्य विभागाने पुर्ण केली आहे. एकुण 4 हजार 234 नागरीक हे परराज्यातून आले. त्यांच्याही आरोग्य तपासणीचे काम पूर्ण झाल्याने आज मतदार संघात कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून गावाबाहेर अवघ्या 6 दिवसात स्वतंत्र कोविड रुग्णालयाची सुसज्जपणे उभारणी व कोरोना चाचणी सुविधा कार्यान्वित केल्याने कोरोनाच्या या लढ्यात प्रवरा परिवाराने केलेले कार्य जिल्ह्यात मार्गदर्शक ठरल्याने आरोग्याचा प्रवरा पॅटर्न राज्यात लक्षवेधी ठरतोय.
COVID-19 Test | कोरोनाची चाचणी स्वस्त होण्याची शक्यता; राज्य सरकारला दर ठरवण्याचं स्वातंत्र्य