Headlines 1st February : देशाचा अर्थसंकल्प सादर होणार, माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप, आरोग्य अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन ; आज दिवसभरात
Headlines 1st February : आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे.
Headlines 1st February : आज देशाचा अर्थ संकल्प संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी 10.15 वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणत्या घोषणा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात असणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.
> दिल्ली
व्हॉटसअपच्या प्रायव्हेट पॉलिसी विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे. युजर्सची माहिती फेसबुकसह अन्य माध्यमांध्ये शेअर करण्याविरोधात ही याचिका आहे.
> मुंबई
- राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन आहे. या आंदोलनात 10 हजार डॉक्टरांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमंडण्याची शक्यता असून, रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येणार आहे. शासकीय रुग्णालयातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रशासनाला निवदेन दिले आहे. सोबतच यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनं देखील केली आहेत. मात्र तरीही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.
- महाराष्ट्र शासनाकडे माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रतील माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारला आहे. या लाक्षणिक संपात मुंबईत विविध ठिकाणी काम करणारे माथाडी कामगार देखील सहभागी होणार आहेत.
- राखी सावंतच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाने मुंबई पोलिसांना निर्देश दिले होते. मूळ तक्रारदार शर्लिन चोप्रा या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. शर्लिनच्या तक्रारीवरूनच आंबोली पोलीस ठाण्यात राखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
> सांगली
मनसे नेते अमित ठाकरे हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज इस्लामपूर आणि आष्टा भागात असणार आहे. पक्ष बांधणीसाठी मागील काही महिन्यांपासून अमित ठाकरे राज्यातील विविध भागात दौरा करत आहेत.
> नागपूर
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कॉन्फंड्रेशन ऑफ स्मॉल ट्रेडर्स मध्ये व्यापारी संघटनांचे पदाधिकारी एकत्रित बसून केंद्रीय अर्थसंकल्प पाहणार आहेत.