Sanjay Raut: ईडीनं संजय राऊतांविरोधात दाखल केलेली याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार
न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचा सुनावणीस नकार दिल्यानं ईडी दुस-या कोर्टात दाद मागणार, पुढील आठवड्यांत न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे सुनावणी होण्याची शक्यता
Sanjay Raut : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांना मंजूर झालेल्या जामीनाला विरोध करणाऱ्या ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी शुक्रवारी नकार दिला. त्यामुळे आता अन्य न्यायमूर्तींकडे ईडीला आपली याचिका सादर करावी लागणार आहे. सध्याच्या रोस्टरनुसार पुढील आठवड्यात न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी होईल.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना 9 नोव्हेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. हा जामीन देताना संजय राऊतांना यात ईडीनं गोवल्याचा निरिक्षण कोर्टानं अधोरेखित केलं आहे. त्याला विरोध करत ईडीनं हा जामीन रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे यावर सुनावणी होणार होती. त्यासाठी दुपारच्या सत्रात एएसजी अनिल सिंह जातीनं कोर्टापुढे हजर होते. मात्र काही कारणास्तव न्यायमूर्ती कर्णिक यांनी यावर सुनावणी घेण्यासाठी नकार दिला. "या याचिकेवर माझ्याकडे सुनावणी घेणे योग्य होणार नाही. त्यामुळे अन्य न्यायालयात दाद मागा" असं त्यांनी ईडीला स्पष्ट सांगितलं. संजय राऊतांसोबत त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांचाही जामीन रद्द करण्याची मागणी ईडीनं हायकोर्टाकडे केली आहे.
राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या तपास कामावर कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संजय राऊत यांची अटक अनावश्यक होती असंही आपल्या निकालात नमूद केलेलं आहे. ईडी स्वतःच्या मर्जीनं ठरवून आरोपींना अटक करत आहे. याप्रकरणात मात्र मुख्य आरोपींना अद्याप अटकच केलेली नाही, हा कार्यपद्धतीतला विरोधाभास न्यायमूर्ती एम.जी. देशपांडे यांनी आपल्या निकालातून स्पष्ट केला आहे. गेली अनेक वर्ष गोरेगाव इथला पत्राचाळ पुर्नविकास प्रकल्प रखडला असून यामध्ये हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे. आणि हा सारा गैरव्यवहार संजय राऊतांच्या आशिर्वादानं झालाय असा आरोप करत दाखल केलेल्या गुन्ह्यात ईडीनं संजय राऊत यांना त्यांच्या राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेत नंतर अटक केली होती. त्यानंतर सुमारे शंभर दिवस संजय राऊत हे कारागृहातच होते.
ईडीचा नेमका युक्तीवाद काय?
तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला. पण, ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केलीय. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आलाय. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर पुढील आठवड्यात कोर्ट काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.