'मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले'; हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया
Haribhau Rathod : मनोज जरांगे यांच्या लढ्याला जर यश मिळाले असेल, तर निश्चितच मंत्री भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत.
Haribhau Rathod On Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) अध्यादेश सरकराने काढला असून, मराठा समाजाच्या लढाईला यश मिळाले असल्याची घोषणा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. दरम्यान, आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले' असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत.
याबाबत बोलतांना हरिभाऊ राठोड म्हणाले की,“मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला, त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली, परंतु तहामध्ये माञ हरले, असे चित्र उभे ठाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या, वंचित बहुजन, आणि बारा- बलुतेदार समाजाची ताटातील 17 भाकरी खाण्यामध्ये असं त्यांनी कुठला विजय प्राप्त केला, त्यांच्या या लढ्याला जर यश मिळाले असेल, तर निश्चितच मंत्री भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत.
ओबीसीचे आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा प्रकार
पुढे बोलतांना हरिभाऊ राठोड म्हणाले की,"सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर, भूकंपाचे धक्के दिलेत. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की, आम्ही काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आता माञ मराठा समाजाला सगेसोयाऱ्यांच्या कुणबी दाखल्या प्रमाणे किवा कुणबी नोंदी प्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार आहे. ओबीसींच्या 17 टक्के आरक्षणामध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज आल्यावर बारा बलूतेदारांच्या ताटातील तसेच मायक्रो ओबीसीचे आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार आहे. ओबिसीचे संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील, यासाठीच आम्ही सांगत होतो की, मराठा बांधवांना न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या नियमानुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन करून आरक्षण द्यावे, जेणेकरून सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय मिळाला असता, असेही हरिभाऊ राठोड म्हणाले.
भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
या सर्व प्रकरणास जितके सरकार जबाबदार आहे, किंबहुना तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्याचबरोबर राठोड यांनी सरकार आणि ओबीसी नेत्यांचा जाहीर निषेध देखील व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; रात्री नेमकं काय घडलं?