(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंबाप्रेमींसाठी मँगो स्पेशल ट्रेन, कोकणातील हापूस आता रेल्वेनं देशभरात जाणार
देशातील कानाकोपऱ्यातील आंबा खवय्यांना कोकणातील हापूस आंब्याची चव चाखता यावी यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला आहे.
Mango Special Train : कोकणातील हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. जगभरात कोकणातील हापूस आंबा पोहोचला आहे. मात्र आता देशातील कानाकोपऱ्यातील आंबा खवय्यांना कोकणातील हापूस आंब्याची चव चाखता यावी यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला आहे. कोकणातील हापूस आंबा आता कोकण रेल्वे मार्गाने देशभरातील मोठ्या शहरामध्ये रेल्वेने पोचवला जाणार आहे. यासाठी कोकण रेल्वेने एका बैठकचे आयोजन केले आहे. ही बैठक कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात होणार आहे. तर कोकणातील हापूस आंबा इतर भागात जावा यासाठी कोकण रेल्वे मार्गावरून आता मँगो स्पेशल ट्रेन धावणार आहे. यातून फक्त कोकणातील आंबा वाहतूक केली जाणार आहे. अशी माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली आहे.
कोकणातून आता थेट मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये हापूस आंब्याच्या या मँगो स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून वाहतूक करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. यासाठी उद्या कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतदार, वाहतूकदार आणि कोकण रेल्वे यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिल 2022 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि रत्नागिरीमधून थेट आंबा पार्सल कसा नेऊ शकतो याबाबत चर्चा होणार आहे. मँगो स्पेशल ट्रेन चालवण्यासाठी या बैठकीमध्ये विचारविनिमय होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस रेल्वे स्थानकात उद्या सायंकाळी 4 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत आंबा बागायतदार, व्यापारी आणि वाहतूकदार यांनी उपस्थित रहावे असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे. बैठकीचे आयोजन कोकण रेल्वेने केले आहे.
कोकणातील हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळालं आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाने कोकणातील अस्सल हापूस आंबा आता देशभरातील मुख्य शहरामध्ये जाणार आहे. कोकणातील हापूस याआधी हवाई, समुद्र, रस्ते मार्गे देश परदेशात पोचला आहे. मात्र, आता कोकण रेल्वेने पुढाकार घेत कोकणातील मँगो स्पेशल ट्रेनने महत्वाचा शहरात पोचावा यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून आंबा उत्पादक बागायतदार आणि कोकण रेल्वेला याचा फायदा होणार आहे. यासाठी कोकण रेल्वेने आंबा बागायदार, आंबा व्यावसायिक, आंबा वाहतूक करणारे वाहतूकदार आणि कोकण रेल्वे अधिकारी यांची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस रेल्वे स्टेशन तर रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आयोजित केली आहे.
नोव्हेंबर महिना संपत आला असला तरीदेखील कोकणात अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणातील भात, नाचणीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं आहे. तर आंबा आणि काजु पीक लांबणीवर गेलं आहे. त्यामुळे बागायतदाराना याचा फटका बसला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर थंडीचा हंगामात आंबा, काजूला मोहोर येतो. मात्र अवकाळी पाऊस अजूनही असल्याने यंदाचा हंगाम लांबणीवर गेला आहे. मात्र कोकण रेल्वेने कोकणातील आंबा बागायतदाराना मँगो स्पेशल ट्रेन सोडून आंबा मोठ्या शहरांमध्ये नेण्यासाठी सोय केली आहे. त्यासाठी कोकणात बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदाराचा फायदा होणार आहे. रेल्वेने आंबा लवकर ग्राहकांपर्यत पोचण्यास मदत होणार आहे.