नागपूरच्या सायन्स काँग्रेसमध्ये महिलांचे स्वागत हळदीकुंकू लावून केल्यानं वाद निर्माण, आयोजकांकडून स्पष्टीकरण
काल आयोजित कार्यक्रमात पाहुण्यांपेक्षा संयोजिकाच जास्त बोलल्या तसेच 'हळदी कुंकू'चे स्वरुप देण्यात आल्याने टीका झाल्यानंतर संयोजिका डॉ. कल्पना पांडे यांनी स्पष्टीकरण दिले.
Indian Science Congress News : नागपूरच्या सायन्स काँग्रेसमध्ये महिलांचं स्वागत हळदीकुंकवानं करण्यावरुन जोरदार टीका झाली. यावर कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एकमेकींना हळदी कुंकू लावणे हे महिलांच्या भावनात्मक देवाणघेवाणीचा प्रकार आहे. त्यात गैर काय आहे? असे स्पष्टीकरण इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये पार पडलेल्या महिला संमेलनाच्या संयोजिका डॉ कल्पना पांडे यांनी दिले. आयोजकांच्या गैरव्यवस्थापनामुळे प्रमुख पाहुणेच नव्हे तर शहरातील नेत्यांनीही आयोजनाकडे पाठ फिरवली आहे. तसेच काल आयोजित वूमेन सायन्स काँग्रेसमध्येही प्रमुख पाहुण्यांपेक्षा संयोजिकाच जास्त बोलल्या. तसेच या कार्यक्रमाला 'हळदी कुंकू'चे स्वरुप देण्यात आल्याने अनेकांनी या कार्यक्रमावर टीका झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना त्या बोलत होत्या.
इंडियन सायन्स काँग्रेसच्या महिलांसाठीच्या विशेष सत्रामध्ये काल आलेल्या महिलांचे स्वागत हळदीकुंकू लावून केल्यानंतर वाद निर्माण झाला होते. एवढेच नाही तर महिला संमेलनाच्या पेंडॉलच्या बाहेर रांगोळ्या घातल्यामुळे ही वाद निर्माण झाले होते. महिला संमेलनात बोलताना कल्पना पांडे यांनी रांगोळीमुळे दुष्ट प्रवृत्तींचे नाश होते, असे मत व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कल्पना पांडे यांना रांगोळीच्या माध्यमातून दुष्ट प्रवृत्तीचे नाश करण्यासाठी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर पाठवा असा उपरोधिक सल्लाही दिला होता. त्या टीकेवर आज कल्पना पांडे यांनी उत्तर दिले.
'हळदी कुंकू महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. एकमेकींचा स्वागत करण्यासाठी हळदी कुंकू लावणे हे महिलांचे एकमेकांविषयी भावना व्यक्त करण्याचे प्रकार असल्याचे पांडे म्हणाल्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई सुद्धा हळदी कुंकू लावायच्या. मात्र हळदी कुंकू लावल्यामुळे त्या युद्ध जिंकल्या असं आपण बोलत नाही, असा तर्क कल्पना पांडे यांनी पुढे केला आहे. दारावर सुंदर रांगोळी किंवा इतर सुंदर वस्तू पाहिल्या की दारातून प्रवेश करताना मनातील दुष्ट विचार बाजूला होतात, चांगले विचार मनात येतात. म्हणून काल रांगोळीचा महात्म्य सांगितल्याचे कल्पना पांडे म्हणाल्या. अशा मुद्द्यावर वाद निर्माण करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते, असा टोलाही कल्पना पांडे यांनी लगावला.
तसेच काल झालेल्या भारतीय महिला कॉंग्रेसमध्ये पद्मश्री राहीबाई पोपरे यांना बोलायला कमी वेळ दिल्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले, त्या म्हणाल्या 'महिला संमेलनाचे कार्यक्रम लांबत होते पुढे लागून अनेक कार्यक्रम तिथेच होणार होते. म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांना भाषण आवरता घ्या असा सल्ला दिला होता. त्यामागे इतर कुठलाही हेतू नव्हता'. दरम्यान काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी काल वुमन काँग्रेस संमेलनात घडलेल्या हळदीकुंकू आणि रांगोळीच्या प्रकाराची खिल्ली उडवत कल्पना पांडे यांच्यासह कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कांचन गडकरी यांना सीमेवर जाऊन रांगोळीच्या माध्यमातून सीमेचे रक्षण करण्याचा उपरोधिक सल्ला दिला होता.
ही बातमी देखील वाचा...
रासायनिक खतं, औषधांच्या वापरामुळे रानभाज्या नष्ट झाल्या, भविष्यात मातीही नष्ट होईल; राहीबाई पोपेरेंचा इशारा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI