Gunratna Sadavarte : सदावर्तेंच्या 12 वर्षाच्या मुलीचा गाडी चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल करण्याची मागणी
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या 12 वर्षांच्या मुलीचा हायवेवर गाडी चालवतानाचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या 12 वर्षांच्या मुलीचा हायवेवर गाडी चालवतानाचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या आधारावर सदावर्ते दाम्पत्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी नितीन यादव यांनी केली आहे. सदावर्तेंनी आपल्या 12 वर्षाच्या मुलीला लायसन्स नसतानाही हायवेवर गाडी चालवण्यास देवून इतरांचे जीवीतास धोका निर्माण केला आहे. त्यामुळे ॲड.गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी नितीन यादव यांनी पोलीस महासंचालक व गृहमंत्र्यांकडे केली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ही मुलगी ठाणे ते दादर दरम्यान कार चालवत असल्याचं सांगितलं जातं आहे. सोबत गाडीचा इन्शुरन्स संपला असल्याने वाहन कायदा अधिनियमानुसार शासनाने गाडी जप्त करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे. नितीन यादव हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील रहिवासी आहेत.
शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी 8 तारखेला दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. हे आंदोलन होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 7 तारखेला उच्च न्यायालयाचा जो निर्णय आला होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुढील आंदोलन हे बारामतीत शरद पवारांच्या गोविंद बाग या निवासस्थानी करणार असल्याचे सांगितले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली. त्यांनंतर 9 तारखेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा निषेध करण्यात आला. खासकरून बारामतीत सदावर्ते यांचा जोरदार निषेध करण्यात आला होता. सोबतच 12 तारखेला सदावर्तेनी बारामतीत येऊन दाखवावं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करेल असं आव्हान राष्ट्रवादीकडून देण्यात आलं होतं. 12 तारखेला सदावर्ते यांनी हे आंदोलनासाठी बारामतीत येणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः आझाद मैदानात दिली होती. पण त्या आधीच सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली.
12 तारखेला सदावर्ते यांनी बारामतीत आंदोलन करणार असल्याची माहिती आधीच दिली होती. त्याचाच विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी येणाऱ्या एसटी आंदोलकांना विरोध करण्यासाठी जमले होते. तणाव निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु एसटी आंदोलक आलेच नाहीत. आता सध्या सदावर्ते हे सातारा पोलिसांच्या ताब्यात असले तरी सदावर्ते यांच्या मुलीचा हा गाडी चालवतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना मिळाला. त्यामुळे नितीन यादव यांनी सदावर्ते दाम्पत्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.