Gunaratna Sadavarte VIDEO : वरळीतून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवून दाखवावी, डिपॉजिट जप्त केलं नाही तर मिशा काढणार; कॉलर उडवत सदावर्तेंचं 'डंके की चोट'पर चॅलेंज
Gunaratna Sadavarte Challenges to Aaditya Thackeray : आपल्याविरोधात करण्यात आलेली तक्रार ही चुकीची असल्याचं सांगत त्याविरोधात कारवाई करणार असल्याचं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी स्पष्ट केलं.
मुंबई: लोकसभा निवडणुकीचे राज्यातील तीन टप्पे पार पडल्यांनंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागल्याचं दिसतंय. राज्याच्या सहकार खात्याने अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचं एसटी बँकेचं संचालकपद रद्द केल्यानंतर सदावर्तेंनी आता थेट आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) आव्हान दिलंय. येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आदित्य ठाकरे यांना चॅलेंज देतो, येणाऱ्या वरळी विधानसभेमध्ये त्यांनी डिपॉजिट जप्त करून दाखवावं. आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही असं थेट आव्हान अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी दिलंय.
आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त करणार
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, तुम्ही वीर जिजामाता नगरमध्ये येऊन पाहा, सदावर्तेच्या मागे किती शक्ती आहे. उद्धव ठाकरेंच्यामागे एकही माणून दिसणार नाही. वरळीमध्ये अंतर्गत खूप काम सुरू आहे, आदित्यच्या पायाखालची वाळू सरकली आहे. वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढून दाखवावी. पहिल्या 25 टक्के मतमोजणीतच आदित्य ठाकरे रडत रडत घरी जातील. त्यांचं डिपॉजिट जप्त करणार.
आमचं संचालक पद रद्द केलेलं नाही, सर्व बातम्या खोट्या असून त्या बातमीचा निषेध करतो असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. तक्रारदार संदीप शिंदे हे शरद पवारांच्या ताटाखालचं मांजर असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमचं संचालकपद रद्द केलं नाही
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, सदावर्ते आणि जयश्री पाटील यांची बातमी देत त्या संदीप शिंदेने पत्रकारांना उल्लू बनवलं. शरद पवार यांच्या ताटाखालचा तो माणूस आहे. अतिशय खोटी लबाड अशी ही बातमी आहे. ही बातमी पसरवण्यामागे कुभांड आहे. बॅंकेवर सामान्य कष्टकरी निवडून आणल्यानंतर शरद पवारांना जळजळ होतेय, सोबतच त्यांच्या आजूबाजूच्यांना आग लागली आहे. आमचं संचालक पद रद्द केलेलं नाही , यासंदर्भात प्रोसिडिंग देखील झालेली नाही. या बातमीचा निषेध करतो.
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, माझ्या बॅंकेचा सीडी रेशो 92 टक्के झालेला आहे. कष्टकऱ्यांना आता कर्ज मिळायला लागलं आहे. ओव्हर ड्राफ्ट देखील सुरू केलंय. आमचं पद मिळकतीचे नाही. संदीप शिंदेची उंची काय? शरद पवार यांच्या उंचीचे आम्ही नाहीत. आम्ही रामाचे आणि नथुरामाच्या विचारांचे लोकं आहोत. ही मूळव्याधासारखी आग यांना लागली आहे. अशा गोष्टी घडलेल्या नाहीत, माध्यमांनी विचार पूर्वक बोललं पाहिजे. आम्ही संदीप शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करत आहोत आणि पोलिसांना तक्रार देत आहोत.
काय आहे प्रकरण?
अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्यानं मोठा दणका दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी यवतमाळमध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आलं नव्हतं. एवढंच नाही तर त्यावर नथुराम गोडसेचे फोटो छापण्यात आले होते. एसटी कामगारांचा राजकारणाशी काहीही संबंध नसताना गोडसेचे फोटो छापणं योग्य नाही अशी तक्रार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर सहकार खात्याने ही कारवाई केली आहे. मात्र संचालकपद रद्द केलं नसल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
ही बातमी वाचा :
VIDEO : 'तो' तक्रारदार पवारांच्या ताटाखालचं मांजर, सदावर्ते का भडकले ?