(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gunaratna Sadavarte: संचालक मंडळाच्या महागड्या हॉटेलमधील बैठका; सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा मोठा दणका
Msrtc news: सदावर्ते दांपत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत, सहकार विभागाकडून मोठी कारवाई. सदावर्ते यांनी एसटी सहकारी बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसेचे फोटो छापले होते.
मुंबई: गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. या दोघांचीही एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय, संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशिर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्ते (Gunaratna Sadavarte) दाम्पत्यावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी केली होती सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती.
4 ऑक्टोबर 2023 रोजी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यावर नथुराम गोडसे यांचे फोटो प्रिंट करण्यात आले होते.वास्तविक पाहता एसटी बँक, एसटी कर्मचारी यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता.
वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे पूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना देणे आवश्यक होते.परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हवे त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. मुख्य म्हणजे पोटनियम बदलाची सुचना सभासदांना देणे बंधनकारक होते.या ठिकाणी बँकेचे तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नींची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणला तो ठरावही सहकार खात्याने रद्द केल्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत. बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत असेही प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररित्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे.
एस टी बाहेरच्या लोकांना बँकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे. या आणि अशा प्रकारच्या एकूण 13 बेकायदेशीर विषयांची तक्रार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती.यातील बहूसंख्य विषयांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सहकार खात्याने सदावर्ते दांपत्याला चांगलीच कायद्याची चपरास दिलेली आहे. यापुढे सदावर्ते यांचा कुठलाही संबंध आता एसटी बँकेशी राहणार नाही.
मागील 70 वर्षात एसटी को-ऑपरेटिव बँकेवर अशी वेळ आलेली नव्हती जी आज सदावर्ते यांनी आणून ठेवलेली आहे. आशिया खंडात नंबर एकची बँक असलेली एसटी ऑपरेटिव्ह बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचे काम सदावर्ते दापत्यांकडून होत होते. त्याला काहीसा आळा यामुळे बसलेला आहे.
संचालक मंडळाच्या महागड्या हॉटेलमध्ये मिटिंग
एकीकडे लग्नसराई तोंडावर असताना एसटी कर्मचारी यांना कर्जवाटप होत नसल्यामुळे मुला-मुलींची लग्न करण्यात मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे हे संचालक मंडळ महागड्या हॉटेलमध्ये मीटिंगच्या नावाखाली नाच-गाण्यांमध्ये मश्गुल आहे. नवनवीन गाड्या संचालक मंडळाकडून खरेदी करण्यात येत आहेत. दुसरीकडे बेकायदेशीर कर्मचारी भरती बँकेत सुरू आहे. परंतु आता या भरतीला देखील सहकार खात्याने स्थगिती दिली आहे. असे असताना देखील कायदा आपला घरचाच आहे असं समजून बेकायदेशीर नोकर भरती एसटी बँकेत सुरू आहे. याचीही तक्रार करण्यात आली असून त्याचीही वरीष्ठ पातळीवर चौकशी होऊन गंभीर कारवाईचे संकेत आले आहेत. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही हे सदावर्ते यांना सहकार खात्याने दाखवून दिले आहे व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीररित्या जे काही ठराव पास झाले होते ते सर्व ठराव स्थगित करून सहकार खात्याने चांगली चपराक सदावर्ते कुटुंबीयांना दिली आहे.
आणखी वाचा