दारूसाठी वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या नातवाची आजोबांकडून हत्या
प्रदीप भांगरे याचे त्याचे आजोबा कमलाकर डगळे यांच्या सोबत सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर चौकशी करुन या हत्येचा छडा पोलिसांना लावला.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये आजोबांनीच दारुसाठी वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या नातवाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील चिचोंडी शिवारातील कृष्णवांती नदीजवळ 2 जुलै रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीच्या शरीराचे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने 9 तुकडे करुन ते तुकडे 2 पोत्यात भरून फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी चिचोंडी गावचे पोलीस पाटील अंकुश मदे यांनी फिर्याद दिल्यानंतर राजूर पोलीस ठाण्यात 301, 201 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याच्या तापसासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि राजूर पोलिसांनी पथके नेमली. मयताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर मयताच्या गळ्यात आणि उजव्या हातात असलेल्या दोऱ्यावरून सुरेश भांगरे याने हा मृतदेह त्याचा भाऊ प्रदीप भांगरे याचा असल्याचे सांगितले. यावरून मृत व्यक्तीची ओळख पटली. आज प्रदीप भांगरे (वय 25) याची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
प्रदीप भांगरे याचे त्याचे आजोबा कमलाकर डगळे यांच्या सोबत सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे आजोबा कमलाकर डगळे यांची कसून चौकशी केली असता कमलाकर डगळे यांनी हत्या केल्याची कबुली दिली आहे.
मयत प्रदीप भांगरे हा त्याच्या आजोबा कमलाकर डगळे यांच्याकडे दारूसाठी वारंवार पैशाची मागणी करायचा. याचा राग आल्याने कमलाकर डगळे यांनी त्यांचा मुलगा हरीचंद्र डगळे याच्या मदतीने प्रदीपची कोयत्याने वार करून हत्या केली. त्यांनतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे 9 तुकडे करून पोत्यात भरून फेकून दिले. दरम्यान पोलिसांनी आरोपी 70 वर्षीय आजोबा कमलाकर डगळे आणि त्यांचा मुलगा हरीचंद्र डगळे यांना अटक केली आहे. मात्र घरातील किरकोळ वादातून आजोबांनीच नातवाची हत्या केल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.