Gram Panchayat Elections : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूजमध्ये पुन्हा मोहिते विरुद्ध मोहिते संघर्ष
Gram Panchayat Elections विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनेलला विरोधी पॅनल देण्याचे काम डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी थेट बारामतीकरांचेही प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष आहे. त्यामुळेच मोहिते विरुद्ध मोहिते या लढतीचे महत्व वाढले आहे.
अकलूज : काही नेत्यांच्या नावाने त्या गावाची ओळख पडते असेच एक नाव म्हणजे अकलूज. अकलूज म्हणजे मोहिते पाटील ही ओळख गेल्या 75 वर्षांपासून महाराष्ट्राला आहे. सहकार महर्षी कै शंकरराव मोहिते पाटील यांनी उभा केलेली सहकाराची चळवळ नंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वाढवली आणि थेट राज्याच्या राजकारणातले एक मोठे घराणे अशी ओळख तयार केली. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूजच्या लोकसंख्या तब्बल 45 हजारापेक्षा जास्त असल्याने यावेळी अकलूज नगरपालिका करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. यासाठी ग्रामपंचायतीवर बहिष्काराची भूमिका सुरुवातीला मोहिते पाटील यांनी घेतली. मात्र विरोधकांशी बैठक फिसकटल्याने पुन्हा ही निवडणूक लागली. खरे तर ही साधी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी थेट बारामतीकरांचेही येथील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष आहे. त्यामुळेच मोहिते विरुद्ध मोहिते या लढतीचे महत्व वाढले आहे.
अकलूजच्या राजकीय साठमारीत विजयसिंह मोहिते पाटलांचे लहान बंधू कै प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते घरापासून फारकत घेत वेगळी चूल मांडली आणि तेव्हापासून अकलूज मध्ये दोन सत्तास्थाने बनली. यात मुख्य घर असलेल्या विजयदादा यांच्यासोबत बाकीचे भाऊ व कुटुंबीय राहिल्याने सर्व सत्तास्थाने ही त्यांच्याच गटाकडे राहिली आहेत. माजी सहकार मंत्री कै प्रतापसिंह मोहिते पाटील हे सुरुवातीपासूनच डॅशिंग आणि बेधडक स्वभावाचे असल्याने त्यांचा वचक आणि कार्यकर्ते आजही त्यांचे पुत्र डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहिले आहे. आता विजयदादा यांच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यात सत्तांतर झाल्याने हे घराणे दुर्लक्षित बनले.
याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह यांना विधानसभेच्यावेळी आपल्या बाजूने बळावल्याने माळशिरस विधानसभेला भाजपाला अगदी निसटता विजय मिळवत अब्रू राखावी लागली होती. आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीत मोहिते विरुद्ध मोहिते असा संघर्ष उभा राहिला असून विजयदादा यांच्या पॅनल समोर धवलसिंह यांनी नुसते पॅनल उभा केले नाही तर आपल्या पत्नी उर्वशीदेवी याना बिनविरोध निवडून आणत निकालात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे विजयदादा यांच्या पॅनलची झालेली सभा विधानसभेची आठवण करून देत असल्याने आता निवडणुकीला संघर्षाची धार चढू लागली आहे. याचाच परिपाक म्हणून विजय दादांच्या पॅनेलचे सर्वेसर्वा असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधकांची एक जागा बिनविरोध आल्याने राजकीय संन्यासाची घोषणा केली होती. मात्र कुटुंबाच्या व कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेर काल जाहीर सभेत ही घोषणा मागेही घेतली.
ग्रामपंचायत निवडणुकीची पहिल्याच सभेत स्वतः विजयदादा, जयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व सर्व इतर मोहिते कुटुंबीयांची उपस्थिती निवडणुकीचे गांभीर्य वाढवणारी होती. राज्यात जरी भाजप शिवसेना विरोधात असल्या तरी अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या स्टेजवर शिवसेना, रिपाईसह इतर अनेक पक्ष व संघटना पाठिंब्यासाठी हजर होत्या. या निवडणुकीत एक जागा आमच्या चुकीमुळे गेली पण उरलेल्या सर्व 16 जागा मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांना आहे .
विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनेलला विरोधी पॅनल देण्याचे काम डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आणि त्यांच्या साथीला फत्तेसिंहदादा माने पाटील, पांडुरंग भाऊ देशमुख अशी ज्येष्ठ मंडळी आल्याने विजयसिंह मोहिते विरोधकांची शक्ती देखील वाढली आहे. प्रतापसिंह यांच्याच प्रमाणे डॅशिंग आणि सरळ अशी ओळख असलेले डॉ धवलसिंह हे नरभक्षक बिबट्याच्या शिकारीस तरुणात फारच लोकप्रिय झाले आहेत. अतिशय तरुण असलेल्या धवलसिंह यांच्याकडून अकलूजकरांच्याही मोठ्या अपेक्षा असल्याने कायम सर्वसामान्य नागरिकांत धवलसिंह वावरत असतात. अकलूजची जनता हे आपले घर आहे आणि कोणतीही लढाई समोरासमोर करा ही वडिलांनी दिलेली शिकवण धवलसिंह लक्षात ठेवून राजकारणाचे धडे गिरवत आहेत. एक जागेवर बिनविरोध विजय मिळवल्यावर आता धवल व त्यांच्या पत्नी उर्वशीदेवी हे अकलूज शहरात घरोघरी जाऊन प्रचार करू लागले आहेत.
अकलूजच्या गोरगरीब जनता , महिला व तरुण ही आपली ताकत असून यंदा अकलूजमध्ये परिवर्तन घडणार असा विश्वास धवलसिंह बोलून दाखवतात. एकूण 17 जागा असलेल्या अकलूज ग्रामपंचायती साठी 16 जागांवर निवडणूक होत असून बहुतेक लढती मोहिते विरुद्ध मोहिते अशाच रंगणार असल्याने अकलूजकर विजयदादांच्या मागे राहणार कि धवलसिंहांनं साथ देणार ते 18 जानेवारीला समोर येईल.