Gram Panchayat Election | तीन दिवसांनी विजयी उमेदवार पराभूत तर पराभूत उमेदवार विजयी
कमलेश गेडाम हे विजयी झाले म्हणजे किमान त्यांचा तसा समज झाला. त्यांनी आपल्या पॅनलच्या इतर विजयी सदस्यांसह याचा विजयोत्सव देखील साजरा केला होता.
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी एका विजयी उमेदवाराला पराभूत तर पराभूत उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम-तळोधी ग्रामपंचायतीत हा प्रकार समोर आला आहे. मात्र हा सर्व प्रकार प्रशासनाच्या चुकीने नाही तर उमेदवाराच्या अतिउत्साही प्रतिनिधीमुळे झाला आहे.
संपूर्ण राज्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम-तळोधी ग्रामपंचायतीची सोमवारी मतमोजणी झाली. प्रभाग क्रमांक 4 मधून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कमलेश गेडाम हे विजयी झाले म्हणजे किमान त्यांचा तसा समज झाला. त्यांनी आपल्या पॅनलच्या इतर विजयी सदस्यांसह याचा विजयोत्सव देखील साजरा केला होता. मात्र आज ते निर्वाचन अधिकाऱ्याकडे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र आणायला गेले असता ते पराभूत झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
या प्रकारामुळे कमलेश गेडाम हे काही काळ गोंधळून गेले. मात्र तहसीलदार कमलाकर मेश्राम यांनी त्यांना अंतिम निकाल, मिळालेली मतं आणि वस्तुस्थिती समजावून सांगितली. बॅलेट मशीन वरचे आकडे नीट न पाहता उमेदवाराचा प्रतिनिधी उत्साहाच्या भरात मतमोजणी केंद्राचा बाहेर पडला आणि त्यामुळे हा गोंधळ झाल्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे कमलेश यांच्या विरोधात उभ्या असलेल्या मनोज सिडाम या उमेदवाराने देखील मतमोजणी केंद्रावर जाऊन आपल्याला किती मतं पडली याची खात्री केली नाही. आणि स्वतःला पराभूत समजून घरचा रस्ता गाठला. किती मतं मिळाली याची नीट खात्री न केल्यामुळे उमेदवार प्रतिनिधीचा अतिउत्साहीपणा आता चर्चेचा विषय बनला आहे.
उमेदवारांना मिळालेली मतं
कमलेश गेडाम - 218 मनोज सिडाम - 236