Sasoon Hospital : पुण्यातील ससून रुग्णालयात आजही रुग्णांच्या रांगा; एका महिन्यासाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात
Sasoon Hospital : सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या (Old Pension Scheme) संपाचा आज चौथा दिवस आहे. या संपाचा परिणाम सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.
Sasoon Hospital : जुन्या पेंशन योजनेसाठी (Old Pension Scheme) सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. या संपाचा परिणाम सामान्य नागरिकांना (Sasoon Hospital) भोगावा लागत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील यंत्रणा मागील तीन दिवसांपासून कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे. सगळं कामकाज संथ गतीने सुरु असल्याने अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या संपामुळे पहिल्या दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे.
एका महिन्यासाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात
पुण्यातील ससून रुग्णालयात हजारो रुग्ण येऊन उपचार घेत असतात मात्र या संपामुळे नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठीच पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस (परिचारक) नियुक्त करायला सुरुवात झाली आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी संपावर आहेत. याचा फटका पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णांना होऊ नये यासाठी 1 महिन्याच्या कालावधीसाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात केली आहे, अशी माहिती अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी दिली आहे. ससून रुग्णालयातर्फे 100 नर्सेस तसेच वर्ग 4 श्रेणीचे कर्मचारी भरतीसाठी जाहिरात दिली होती. या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात 35 नर्सेस रुजू झाल्या आहेत.
रुग्णांच्या रांगा, उपचाराअभावी ज्येष्ठ नागरिक खोळंबले
दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. रोज सकाळी अनेक नागरिकांना कार्ड काढण्यासाठी आणि उपचारासाठी ताटकळत बसावं लागत आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात फक्त पुणे जिल्ह्यातील रग्ण उपचारासाठी येत नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी येत असतात. त्या सगळ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी डॉक्टरांची वाट बघावी लागत आहे, मात्र डॉक्टर्स आणि नर्सेस संपात सहभागी झाले आहेत. आज सकाळीदेखील ससून रुग्णालयामध्ये हिच परिस्थिती पाहायला मिळाली. रुग्णांच्या मोठ-मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. अनेक ज्येष्ठ नागरिक उपचाराअभावी खोळंबलेले दिसले. काहींचा केस पेपर तयार करायला कोणी नव्हतं तर काही खिडक्या बंद होत्या.
मात्र डॉक्टरांकडून सर्व उपचार सुरळीत सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोणत्याही पद्धतीचा नागरिकांना त्रास होत नाही आहे. रुग्णालयातील सर्व कामकाज सुरळीत सुरु असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या संपामुळे नागरिकांवर किंवा रुग्णांच्या (Sasson Hospital) उपचारावर परिणाम होऊ नये, यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.