'काही दिवसात जयंत पाटलांच्या घरासह बारामती-मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा असेल' : गोपीचंद पडळकर
बारामती, मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या वर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
Gopichand Padalkar on NCP At Sangli: भाजप आमदार (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल. त्यानंतर बारामती, मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या वर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित करून 90 टक्के लोक भाजपमध्ये येतील, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. सांगली जिल्ह्यातील उटगी येथील सभेत गोपीचंद पडळकर बोलत होते.
पडळकर म्हणाले की, भाजपचा झेंडा राष्ट्रवादीच्या काही कार्यालयात लागला आहे. हा झेंडा काही दिवसांनी प्रदेशाध्यक्षांच्या घरावर लागलेला असेल. हे मी जबाबदारीने बोलतोय.
आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते फिरले तरी राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर भाजपचे झेंडे लागत आहेत. मागील आठ-दहा दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, माझे बाबा जर राज्यभर फिरले तर पुन्हा आमची सत्ता येईल. पडळकर म्हणाले की, आता त्यांना कार्यकर्त्यांना विचारावं लागेल की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित करावं लागणार आहे तर आपण काँग्रेसमध्ये जायचं की भाजपमध्ये. मग त्यांच्यात वाद तयार होईल आणि बहुमताने लोक म्हणतील की भाजपमध्येच जाऊयात, ही परिस्थिती पुढे येणार आहे, असं पडळकरांनी म्हटलं.
कुणी म्हटलं म्हणून कुठला पक्ष संपत नसतो- रोहित पाटील
'राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विसर्जित होईल' या गोपीचंद पडळकर याच्या टिकेवर बोलताना रोहित पाटील यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून शरद पवारांनी महाराष्ट्र विकासाकडे नेण्याचे काम केलंय. महाराष्ट्रच्या मुळापर्यंत राष्ट्रवादी पक्ष पोहोचला आहे, कुणी म्हटलं म्हणून कुठला पक्ष संपत नसतो, जो पक्ष लोकांसाठी काम करतो तो पक्ष टिकतो असं रोहित पाटील यांनी म्हटलं. यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले की, छळ, कपट, अहंकार हे शब्द खासदार संजय काका पाटील यांच्या तोंडून येणे योग्य नाहीत. कवठेमहांकाळच्या लोकांना नगराध्यक्ष निवडणूकमधील प्रकार पटलेला नाही. आमच्या काही नगरसेवकांवर दबाव टाकला गेला. निकाल जर चिठ्ठीच्या जोरावर होत असेल तर हा पराभव माझा आहे की त्यांचा आहे हे त्यांनी बघावे असे म्हणत दबाव आणि पैशाच्या जोरावर कवठेमहांकाळ नगरपंचायतची नगराध्यक्ष निवडणूक लढवली गेली असे रोहित पाटील यांनी म्हटलंय.