Gondia News : गोंदियाच्या जलाशयावर मोठ्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन; पक्षी अभ्यासकांसाठी पर्वणी
Gondia News: गोंदिया जिल्ह्यातील माहुरकुडा तलावावर रेड क्रेस्टेड पोचार्ड या स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून हे विदेशी पक्षी, पक्षीमित्र आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Gondia News गोंदिया : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया(Gondiya)जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरवात होत असते. अशातच, अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या माहुरकुडा तलावावर रेड क्रेस्टेड पोचार्ड(Red Crested Pochard Birds) या स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून हे विदेशी पक्षी, पक्षीमित्र आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष बाब म्हणजे गेल्या 15 वर्षांच्या संख्येची गोळाबेरीज केली तर यावर्षी जेवढ्या संख्येने या विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहेत तेवढी मोठी संख्या होणार नाही, असा पक्षी अभ्यासकांचा अंदाज आहे.
400 ते 500 रेड क्रेस्टेड पोचार्ड स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या आहे. या तलावांवर मोठ्या प्रमाणात जैव विविधता टिकून असल्याने पक्ष्यांसाठी खाद्य सामग्री मोठ्या प्रमाणात टिकून आहे. त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात. मात्र माहुरकुडाचा तलाव या बाबतीत गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित होता. दरवर्षी येथे स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते. मात्र या वर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली आहे. या तलावावर विदेशी पाणपक्ष्यांचा वावर आणि किलबिलाट हे पक्षी निरीक्षक आणि पक्षी प्रेमींचे लक्ष वेधणारा ठरत आहे.
माहुरकुडाच्या तलावावर पहिल्यांदाच एका विशिष्ट प्रजातीची मुबलक प्रमाणात संख्या थक्क करणारी आहे. या ठिकाणी अंदाजे 400 ते 500 रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्षी गेल्या आठ दिवसापासून मुक्कामी आले आहेत. मागील 15 वर्षांच्या संख्येची बेरीज केली तरी यावर्षी जेवढे पक्षी आले आहेत त्यापेक्षा जास्त पक्षी या वर्षी एकाच तलावावर आले असल्याचा पक्षी अभ्यासकांचा अंदाज आहे. या तलावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बुटाई तलाव आहे. त्या ठिकाणी दरवर्षी ग्रेलेग गूज, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, युरेशियन पिन टेल, कॉमन कुट आणि इतर प्रजातीचे स्थानिक तसेच स्थलांतरीत पाणपक्षी सध्या या तलावावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासकांसाठी ही फार मोठी पर्वणीच ठरत आहे.
रेड क्रेस्टेड पक्ष्याची वैशिष्ट्ये
रेड क्रेस्टेड पोचार्ड या पक्ष्याला मराठीत मोठी लालसरी या नावाने ओळखले जाते. याची सरासरी लांबी 53 ते 57 सेंमीपर्यंत असते. याचे डोके लालसर शेंदरी रंगाचे असून चोच लाल रंगाची असते. याची छाती आणि गळा काळ्या रंगाचा असतो, तर शेपटीकडील भाग दुरून काळसर दिसतो. त्यांचे आवडते खाद्य पाण वनस्पती आणि पाण वनस्पतींचे कोंब, मूळ, लहान-मोठे जलकीटक आदी असते.
महत्त्वाच्या बातम्या: