Nana Patole : अखेर मोदी नावाचा 'गावगुंड' पोलिसांना गवसला, मात्र त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा नसल्याचं स्पष्ट
नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी पोलिसांना सापडला असला तरी त्याच्या विरोधात पोलिसात कुठलेही गुन्हे दाखल नाही.
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारुही शकतो, व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केल्यावर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते.नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी नाही तर मोदी नावाच्या गावगुंडा विषयी बोललो असल्याचे सांगितले होते. आता तो गावगुंड पोलिसांना गवसला असून पोलिसांनी चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठाना पाठविले आहे. पण त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंद नसल्याचं स्पष्ट झालंय.
भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार संपल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो, व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले असताना संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटले असून वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. नंतर नाना पटोले यांनी यूटर्न घेत आपण देशाच्या पंतप्रधानांच्या विषयी बोललॊ नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोललो असल्याचे वक्तव्य केले होते. त्याची चौकशी पोलीस करीत असून पोलिसांनी टोपण नाव असलेल्या मोदी नावाच्या व्यक्तीची चौकशी केली.
लाखनी तालुक्यातही गोंदी गावातील उमेश प्रेमचंद घरडे हा मोदी नावाने ओळखला जातो. याला दारूचे व्यसन असल्याने त्याला कंटाळून त्याची पत्नी व संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतात. उमेश दोन वर्षांपासून गावात एकटाच राहतो. , दारु पिऊन गावकऱ्यांना तो शिवीगाळ करतो. मात्र त्याच्या विरुद्ध पोलिसात अजूनही कुठलीही तक्रारी दाखल झाली नाही. तसेच तो गावगुंडही नाही. पालांदूर पोलिसांनी उमेश घरडे यांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. मग नाना पटोले यांनी कोणत्या मोदी विषयी भाष्य केले असा प्रश्न विचारला जात आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
भंडाऱ्यात घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असं वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रचाराच्या दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा होता. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी दुसऱ्या एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं होतं. नाना पटोले म्हणाले होते की, "भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते नाही."
महत्त्वाच्या बातम्या
- 'मी मोदींना मारु शकतो' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य, व्हिडीओ होतोय व्हायरल
- जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही? चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल