(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gokul Election Results 2021 : गोकुळ दूध संघावर कोणाची सत्ता? आज निकाल, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघासाठी ठरावधारकांनी 2 मे रोजी मतदान केलं. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अखेर दीड वर्षापासून रखडलेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 9 वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे साधारण दीड वर्ष रखडलेल्या गोकुळच्या या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान पार पडलं. एकूण 3 हजार 547 मतदार असलेल्या या गोकुळ दूध संघात 99.78 टक्के इतकं मतदान पार पडलं होतं. प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार आणि कोणाच्या अंगावर गुलाल उधळला जाणार हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकतं.
कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकूळ कोणाकडे राहणार याचा फैसला आज होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 70 केंद्रांवर हे मतदान पार पडलं. या मदनान प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयानं कोरोना संकटात निवडणूक घेण्यासाठी जे आदेश दिले होते त्या आदेशांचं पालन करत हे मतदान पार पडलं. आज प्रत्यक्ष मतमोजणी पार पडणार आहे. अनेक मंत्री, खासदार, आमदारांनी निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतल्यानं निवडणुकी चुरशीची झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकावर जोरदार आरोप आणि प्रत्यारोप केल्यामुळे या निवडणुकीत रंग भरला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं निकालाची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला लागली आहे.
पाहा व्हिडीओ : Gokul Election 2021 : गोकुळ निवडणुकीचा आज निकाल; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध सतेज पाटील, हसन मुश्रीफ असं चित्र पाहायला मिळालं. गेली 25 वर्ष याठिकाणी काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक या गटाकडे सत्ता होती. दोन्ही गटांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. दरम्यान, गोकुळच्या निकालानंतर मिरवणूक काढली तर गुन्हे दाखल केले जातील, अशा सूचना कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेंद्र बलकवडे यांनी दिल्या आहेत.
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघासाठी ठरावधारकांनी 2 मे रोजी मतदान केलं. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूनं शक्तीप्रदर्शन करत विजयी होणार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र गोकुळच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार हे नक्की आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gokul Election : गोकुळमध्ये सत्तांतर होणार की नाही; सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक आमनेसामने