Gokul Election 2021 : गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटलांची बाजी, तीन दशकांनंतर सत्तांतर
सतेज पाटील यांच्या आघाडीला 21 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ज्या गोकुळ दूध संघाच्या अवतीभवती फिरत त्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गोकुळमध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झालं आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीने निवडणुकीत बाजी मारली आहे.
सतेज पाटील यांच्या आघाडीला 21 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता आता संपुष्टात आली आहे.
कोरोनामुळे साधारण दीड वर्ष रखडलेल्या गोकुळच्या या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान पार पडलं. एकूण 3 हजार 547 मतदार असलेल्या या गोकुळ दूध संघात कोल्हापूर जिल्ह्यातील 70 केंद्रांवर 99.78 टक्के इतकं मतदान पार पडलं होतं.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध सतेज पाटील, हसन मुश्रीफ असं चित्र पाहायला मिळालं. गेली 25 वर्ष याठिकाणी काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक या गटाकडे सत्ता होती. दोन्ही गटांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं.