जळगावात नदीचं पाणी कोविड रुग्णालयाच्या तळघरात शिरल्याने रुग्णांची तारांबळ
जळगाव जिल्ह्यात काल मध्यरात्री अचानक नदीचं पाणी गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरात शिरल्याने रुग्णांची तारांबळ उडाली. मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.
जळगाव : जिल्ह्यात काल ( शनिवारी) मध्य रात्रीच्या सुमारास काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे साके गाव परिसरात असलेल्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरात पाणी शिरले. अचानक पाणी शिरल्याने रुग्णांना तातडीने इतर ठिकाणी हलविताना रुग्णालय प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गिरीश महाजन यांनी टीका केलीय. जळगाव जिल्ह्याचा कारभार हा नियोजन शून्य असून त्याला कोणी वाली नसल्यासारखा सुरू असल्याचं म्हटलं आहे.
आज पहाटे दोन वाजेपासून सकाळी साडेतीन वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी आपत्कालीन विभागात दहा ते बारा रुग्ण ऍडमिट होते. पावसाचे पाणी वाढत असल्याने नातेवाईक आणि रुग्णालयाच्या प्रशासनाने समन्वय साधत त्यांना तातडीने अन्य वॉर्डात हलविले. यावेळी नातेवाईक आणि प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. यावेळी रुग्णलयातून आपल्याला सहकार्य मिळाले असे काही रुग्ण नातेवाईक सांगत आहेत. तर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र आपल्या रुग्णालयात भरती करून घेण्यासाठी प्रशासनाने ताटकळत ठेवल्याचा आरोप केलाय.
जळगाव जिल्ह्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाच्या वतीने कोविड रुग्णांसाठी आणि नियमित रुग्णांसाठी गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय अधिग्रहित करण्यात आले आहे. रुग्णालयाचा परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने काही वेळातच पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ होऊन पाणी गोदावरी रुग्णालयाच्या तळघरात शिरले. या तळ घरातच अपघात ग्रस्त रुग्णांसाठी आपत्कालीन कक्ष आहे. याच कक्षात काही वेळातच गुडघ्या एवढे पाणी शिरल्याने त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांना भर पाण्यातून बाहेर काढताना रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, या ठिकाणी रुग्ण संख्या मर्यादित असल्याने रुग्णांना तातडीने इतर विभागात हलविण्यात यश मिळाले असले तरी रुग्णालयात पुराच पाणी शिरल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, की जळगाव जिल्ह्याचा कारभार हा नियोजन शून्य असून देवाच्या भरवशावर, कोणी वाली नसल्यासारखा सुरू आहे. एकीकडे कोरोनामुळे लोक मरत आहेत आणि शासन प्रशासन यांच्यात कोणताही समनवय पाहायला मिळत नाही. कोविड रुग्णालयात गलथान पणाचा कारभार सुरू असून उपचाराकडे लक्ष नाही. रुग्णांचे तपासणी अहवाल वेळेवर येत नाहीत. त्यामुळं मोठ्या अडचणींना जनतेला सामोर जावं लागतं आहे. आम्ही कोणत्याही सूचना केल्या तरी अंमलबाजवणी होत नाही. विश्वासात घेतलं जातं नसल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. आम्हाला याबाबत राजकारण करायचे नाहीच. मात्र, रुग्णांच्या सेवेत सुधारणा व्हायला पाहीजे, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
रात्री उशिरा झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात पाणी शिरले. मात्र, पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी महामार्ग चौपदरी करणाचं काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राष्ट्रीय महामार्ग विभागाला आता दिले आहे. या घटनेमागील कारणांचा विचार केला तर अचानक झालेला मुसळधार पाऊस आणि हायवेरचं चौपदरी करणाचं काम सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह हा गोदावरी रुग्णालयाकडे वळल्याचे लक्षात आले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिलेत.