(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganeshotsav 2022 : आज पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन, प्रशासनाची जय्यत तयारी
Ganesh Visarjan : आज पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होणार असून त्यासाठी मुंबईसह राज्यात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Ganpati Visarjan 2022 : आज पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. श्री गणेश चतुर्थीला आगमन झाल्यानंतर पाच दिवस पाहुणचार घेतलेल्या आज लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. चौपाटी आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई पालिकेची जय्यत तयारी
मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे, तसेच यासाठी तब्बल 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी
राज्यभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. मुंबईत देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सवात साजरा केला जात आहे. आज 4 सप्टेंबर रोजी पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.
परंतु, इतर जड वाहनांना या दिवशी मुंबईत प्रवेश करता येणार नाही. मुंबई वाहतूक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police ) याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गणपती विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, तसेच विसर्जनावेळी मुंबईत कोणत्या ही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर विशेष व्यवस्था
मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक ही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. यंदा दीड दिवसांच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.