(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी, 211 स्वागत कक्ष आणि 10 हजार कर्मचारी तैनात
Ganesh Visarjan : रविवारी पाच दिवसांच्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन होणार असून त्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे.
मुंबई : पाच दिवसांच्या गणेशाचं उद्या म्हणजे रविवारी विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे, तसेच यासाठी तब्बल 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
गणेश विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या तयारीबाबत ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे
1. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष.
2. प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीव रक्षक तैनात.
3. नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे 45 मोटार बोट आणि 39 जर्मन तराफा व्यवस्था.
4. सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष.
5. अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी 3 हजार 069 फ्लड लाईट आणि 71 सर्च लाईट व्यवस्था.
6. महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे 188 प्रथमोपचार केंद्र आणि 83 रुग्णवाहिका.
7. निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे 357 निर्माल्य कलश आणि 287 निर्माल्य वाहने.
8. अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी 48 निरिक्षण मनोरे आणि आवश्यक तेथे संरक्षक कठडे.
9. महत्त्वाच्या विसर्जन स्थळी 134 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था.
10. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध.
11. चौपाट्यांवर श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येणा-या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी 460 पौलादी प्लेटची व्यवस्था.
12. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था.
13. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सुमारे 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांना श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कार्यतत्पर राहण्याचे निर्देश.
समुद्र किनाऱ्यावर विशेष व्यवस्था
मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जीव रक्षक ही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. यंदा दीड दिवसांच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.