सोलापुरात मटक्याचा खटका! तब्बल 307 कोटी रुपयांची उलाढाल, भाजप नगरसेवकासह 70 जणांना बेड्या
सोलापुरात मटका प्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकासह जवळपास 288 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर : सोलापुरात मटका प्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकासह जवळपास 288 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यापैकी 70 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या मटका प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी भाजप नगरसेवक सुनील कामाटी याला एका महिन्यानंतर हैदराबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
24 ऑगस्ट सायंकाळी 4च्या सुमारास सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या टीमला सोलापुरातील कुंची कोरवे गल्ली येथील एका इमारतीत मटका व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहिती नुसार गुन्हे शाखेने इमारतीवर धाड टाकली. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पळून जाताना एकाचा यामध्ये मृत्यू झाला होता. या कारवाईत पोलिसांनी घटनेच्या दिवशी 40 जणांवर गुन्हा दाखल करत 28 जणांना ताब्यात घेतलं. घटनेचा तपास करत असताना आतापर्यंत या प्रकरणी 288 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शहरात मटका चालवणाऱ्यापैकी प्रमुख सुत्रधार हा भाजप नगरसेवक सुनील कामाटी असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. सोबतच सुनील कामाटीसोबत पोलिस कर्मचारी स्टीफन स्वामी हा देखील भागीदार असल्याचं समोर आल्याने पोलिस आयुक्तांनी पोलिस कर्मचारी स्टीफन स्वामीला अटक करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचे निलंबन देखील करण्यात आले.
तब्बल 307 कोटी रुपयांची उलाढाल
सोलापुरातील मटका प्रकरणात गुन्हे शाखेने 69 जणांना अटक केली. मात्र मुख्य आरोपी असलेला नगरसेवक सुनील कामाटी हा मात्र 24 ऑगस्टपासून फरार होता. अखेर बुधवारी 23 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हैदराबाद येथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सुनील कामाटीच्या घरात आढळलेल्या मटक्यांच्या हिशोबाच्या डायरीमधून मागील 3 वर्षात तब्बल 307 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. जुलै 207 ते ऑगस्ट 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत अवैध मटका चिट्ट्यांच्या माध्यमातून त्याचे भागीदार, लाईनमन आणि एजंटच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे आणि मोबाईलवरुन मटका घेऊन सुमारे 307 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे.
सुनील कामाटीच्या मालमत्तेची चौकशी होणार
भाजप नगरसेवक सुनील कामाटी याने सोलापूर महानगरपालिका नगरसेवक पदाचा दुरुपयोग करुन अवैध मटक्याचे नेटवर्क चालवून अशिक्षित, गोरगरीब, मजूर वर्गास बक्षिसांचे अमिष दाखवून त्यांची लूट केली. परिणामी त्यांची आर्थिक स्थिती खालविण्यास आणि त्यांच्या कुटुंबियाची पिछेहाट होण्याच आणि त्याचा सामाजिक, आर्थिक स्थर घटण्यास कारणीभूत असून हा गंभीर गुन्हा असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. नगरसेवक सुनील कामाटी याची सोलापुरातील विविध भागात मालमत्ता, जमीन आहे. तर पुण्यात देखील कामाटी याने संपत्ती खरेदी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे सुनील कामाटी याच्या मालमत्ता, जमीन, वाहने, बँक खात्यांच्या चौकशीसाठी पोलिसांकडून आरटीओ, महापालिका कर विभाग, दुय्यम निबंधक विभाग, विविध बँकाना पत्र देण्यात आले आहेत.
सुनील कामाटीच्या गुंडप्रवृत्तीची चर्चा
सुनील कामाटीने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासून केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन कामाटीचे पक्षातील स्थानिक नेत्यांशी वाद देखील झाले. तर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पक्षाच्या बैठकीत कामाटीने आपल्या समर्थकांसह बराच राडा देखील केला. त्यानंतर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुनील कामाटीला भाजपमध्ये प्रवेश दिला. 2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुनील कामाटीने भाजपकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुनील कामाटी निवडून देखील आला. राजकीय कारकिर्दीपेक्षा सुनील कामाटीच्या गुंडप्रवृत्तीची चर्चा नेहमीच होत असायची. सोलापूर शहरात सुनील कामाटी विरोधात आतापर्यंत 24 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला शहरातून तडीपार करण्यात यावे अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
सोलापुरातील या मटकाप्रकरणात सुनील कामाटीसोबत प्रमुख भागीदार असलेल्या ईस्माईल मुच्छाले याला देखील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं आहे. आरोपी ईस्माईल मुच्छाले याच्या विरोधात देखील सोलापूर शहरात तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींनी बुधवारी सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी सुनील कामाटी हा गुन्हा दाखल झाल्यापासून प्रवीण गुजले याच्या मालकीच्या इनोव्हा कार मधून गुलबर्गा, रायचूर, विजयवाडा, मछलिपट्टनम, हैदराबाद इत्यादी ठिकाणी फिरत होता. त्याला पोलिसांपासून पळण्यात तसेच अवैध व्यवसायात मदत केल्याप्रकरणी गाडी मालक प्रवीण गुजले, हुसेन तोनशाळ आणि सुनील कामाटीची पत्नी सुनिता कामाटी यांच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा केला असून त्यांनी देखील अटक करण्यात आली आहे. मटका प्रकरणात सोलापुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईपैकी आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्यांचं बोललं जात आहे. मुख्य आरोपी सुनील कामाटी याची राजकीय कारकीर्द पाहता सुनील कामाटी याला आणखी कुणाकुणाचं पाठबळं होतं याचा शोध घेणं हे पोलिसांसमोर पुढचं आव्हान असणार आहे.