आंबेजोगाईत वानरावर वाजत-गाजत अंत्यसंस्कार, विजेचा शॉक लागून झाला होता मृत्यू
Beed News Update : बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई शहरात झाडावरून उडी मारत असताना विजेचा शॉक लागून या वानराचा मृत्यू झाला. मृत वानरावर वाजत-गाजत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Beed News Update : आंबेजोगाई शहरात विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या वानरावर वाजत-गाजत अंत्यसंस्कार करण्यात आले. झाडावरून उडी मारत असताना विजेचा शॉक लागून या वानराचा मृत्यू झाला. गावातील हनुमान मंदिरासमोरच वानराचा मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्यावर वाजत-गाजत अंत्यसंस्कार केले.
आंबेजोगाई शहरातील हनुमान मंदिरासमोरील वडाच्या झाडावरून समोरच्या इमारतीवर उडी मारत असताना वानर शेजारील वीजेच्या तारांना चिटकले. त्यामुळे शॉक लागून ते मंदिरासमोरच खाली पडले. त्यावेळी सोबत असलेले वाहर मदतीसाठी धावले. घटनास्थळी उपस्थित असलेले गावकरीही वानराच्या मदतीला धावले. परंतु, वानराला वाचवण्यात अपयश आले.
मंदिराच्या समोर वानराचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले आणि लोकांनी हनुमान मंदिरासमोर गर्दी केली. मंदिरासमोर जमा झालेल्या हनुमान भक्तांनी या वानरावर वाजत-गाजत अंत्यसंस्कार करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर तासाभरात भजनी मंडळ भजन कीर्तनात दंग झाले. मृत वानराचा दर्शनासाठी लोक जमू लागले. टोपी घातलेले आणि गुलाल लावलेले वानर पायावरती बसवले होते. त्याच्यासमोर प्रसादाचा ढीग वाढत चालला होता. वानराची पूजा करण्यासाठी लोक गर्दी करत होते.
भजन-कीर्तन संपल्यानंतर रस्त्यामध्ये रांगोळी काढण्यात आली. परिसरातील महिलांनी रस्त्यावर सडा टाकला. त्यानंतर वानराला एका सजवलेल्या पालखीमध्ये बसवण्यात आलं आणि पालखी खांद्यावर घेऊन हनुमान भक्तांनी काळा हनुमान मंदिराकडून अंत्ययात्रा काढली आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या