महापूर नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी द्या : शरद पवार
पुराच्या पाण्यामुळे शेती पाण्याखाली गेल्याने उसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक जनावर वाहून गेली आहेत. व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
पुणे : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगलीची स्थिती अजूनही बिकट आहे. दरम्यान, महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
पुराच्या पाण्यामुळे शेती पाण्याखाली गेल्याने उसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक जनावर वाहून गेली आहेत. व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. पाणी ओसरल्यानंतर सरकारने नुकसानाची पाहणी करावी आणि ताबडतोब नुकसान भरपाई द्यायला हवी, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.
केंद्र सरकारने पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन अधिकची मदत करणे आवश्यक आहे. सरकारला आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करु, असंही शरद पवारांनी सांगितलं. राज्य सरकारने एनडीआरएफसारखी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक असल्याचंही शरद पवार म्हणाले.
पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी त्यांचे एक महिन्याचे मानधन देणार आहेत. तसेच सामाजिक संस्था आणि इतरांनीही पूरग्रस्तांना मदत करावी असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.