(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी आई, मग वडील, त्यापाठोपाठ दोन भाऊ; 20 दिवसांत कोरोनानं कुटुंबातील चौघांना हिरावलं
आधी आई, मग वडील, त्यापाठोपाठ दोन भाऊ, अवघ्या 20 दिवसांत कोरोनानं कुटुंब उद्ध्वस्थ केलं. नुकतेच शिराळा येथील शिरशी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका कुटुंबातील चार जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्यामुळे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सांगली : जिल्ह्यातील आणखी एका कुटूंबावर कोरोनाने घाला घातला आहे. अवघ्या 20 दिवसांत हे कुटुंब उद्धवस्थ झालंय. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील हे कुटुंब असून या कुटूंबातील चौघांचा एकापाठोपाठ एक असा 20 दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आधी आई-वडील आणि त्यापाठोपाठ दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. नुकतेच शिराळा येथील शिरशी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका कुटुंबातील चार जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्यामुळे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वैजंयंता सुखदेव मोहिते (75), सुखदेव पांडुरंग मोहिते (80), अशोक सुखदेव मोहिते (58) आणि अनिल सुखदेव मोहिते (47) असं मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावं आहेत.
कुटुंबातील अनिल सुखदेव मोहिते यांच्या आई वैजंयंता सुखदेव मोहिते (75) यांचा कोरोना अहवाल पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 30 एप्रिल रोजी त्यांना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोना चाचण्यांचा अहवालात अनिल यांचे वडील सुखदेव पांडुरंग मोहिते (80) यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अनिल आणि अशोक या दोन भावांनी वयोवृद्ध असलेल्या वडिलांना उपचारासाठी बेड मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र बेड न मिळाल्यानं त्यांचा 6 मे रोजी घरातच मृत्यू झाला. आई पाठोपाठ वडील सोडून गेल्याचा अनिल आणि अशोक या दोन भावांसठी मोठा धक्का होता. दरम्यान काही दिवसांतच दोन्ही भावांनी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
आई आणि वडिल गेल्याच्या दुःखातून सावरत नाही तोवर या दोन भावांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं संपूर्ण कुटुंबच हादरले. अनिल यांचा मोठा भाऊ अशोक सुखदेव मोहिते (58) यांना कडेगाव मधील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरु असतानाच 15 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे अनिल सुखदेव मोहिते (47) यांनाही विटा येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. पण दुर्दैव की उपचारादरम्यान अनिल यांचाही मृत्यू झाला. आई-वडील आणि त्यांच्या पाठोपाठ दोन्ही भावांचाही कोरोनाने अवघ्या 20 दिवसांत मृत्यू झाला. ही घटना या कुटुंबातील उर्वरित सदस्यांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. आता या मोहिते कुटुंबात अनिल आणि अशोक मोहिते यांच्या पत्नी आणि सहा मुले असा परिवार आहे. आई-वडील आणि त्यानंतर दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने अनिल आणि अशोक यांच्या पत्नी आणि मुलांना मोठा धक्का सहन करावा लागत आहे. कोरोनाने आणखी किती कुटुंबं अशा पद्धतीने मरणाच्या दाढेत ओढली जाणार याची भीती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :