Coronavirus : कोरोनानं घात केला... तेरा तासांत आई-वडील आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू
Coronavirus : सांगलीतील झिमुर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 13 तासाच्या आत आई, वडील आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आठ दिवसांपूर्वी याच मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे आठ दिवसांत झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला.
सांगली : जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक कुटुंब कोरोनाने उध्वस्त झाले आहे. शिराळा तालुक्यामधील शिरशी येथील झिमुर कुटुंबियांवर हे कोरोनाचं संकट जीवघेणं ठरलं आहे. अवघ्या 13 तासांत हे कुटुंब उध्वस्त झाले आहे. सकाळी 5 वाजता वडील, तर सायंकाळी पाच वाजता आई आणि त्यानंतर सहा वाजता मुलगा असे तेरा तासात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ दिवसांपूर्वी चुलत भावाचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आठ दिवसांत झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. आई, वडील आणि मुलगा आणि पुतण्या असा चौघांचा मृत्यू झाल्याने शिरशी गावात शोककळा पसरली आहे.
शिराळा उत्तर भागातल्या शिरशी गावातील झिमुर कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबईला होते. ज्यांचा मृत्यू झाला ते वडील गिरणी कामगार होते. सेवानिवृत्त झाल्यानं आपल्या पत्नीसह १५ वर्षांपूर्वी ते गावी आलेत. शेती करू लागले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुली विवाहित आहेत. मुलगा मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याचे एक वर्षापूर्वी लग्न झाले. त्याची पत्नी ही पदवीधर आहे. तो इंजिनिअर असणारा मुलगा पंधरा दिवसांपूर्वी गावी आला. त्यावेळी आई आजारी असल्याने गावीच थांबला. आईला कोरोनाची लागण झाली. तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान त्याच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झाली. त्या दोघांवर उपचार सुरु झाले. आई वाडीलांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. मात्र पुनः वडिलांची तब्बेत बिघडली. दरम्यान मुलाला ही कोरोनची लागण झाली.
तिघांवरही कोरोनाचे उपचार सुरु असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यावेळी आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते. सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजता वडिलांचे निधन झाले. सकाळी झिमुर कुटुंबियांनी त्यांचे अंत्यसंस्कार आटोपले. तोपर्यंत आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते. सायंकाळी पाच वाजता आईचे निधन झाले. हा झिमुर कुटुंबियांवर 12 तासांत दुसरा आघात होता. ते दुःख समोर उभे असतानाच आईच्या निधनानंतर अवघ्या एका तासातच मुलाची प्राणज्योत मालवली. तेरा तासात एकाच कुटुंबातील तीन जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. एकाच दिवशी हा आघात झाल्याने शिरशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आठ दिवसांपूर्वी याच मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे आठ दिवसांत झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- नांदेडमधील पार्डीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; कुटुंबातील चार प्रमुख व्यक्तींचं 15 दिवसांत कोरोनामुळे निधन
- सांगलीत जमिनीच्या वादातून नंदीवाले समाजातील 4 कुटुंबांवर बहिष्कार, कुटुंबांची पोलीस आणि अंनिसकडे तक्रार
- 'घराचे पत्रे कोसळत होते, तेवढ्यात नातवाला खेचलं म्हणून...' 'तोक्ते'मध्ये सुपरहिरो ठरलेल्या आजोबांच्या तोंडून वादळातला थरार