(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devi Singh Shekhawat Passes Away : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Devi Singh Shekhawat Passes Away : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झाले.
Devi singh Shekhawat passes away : भारताच्या प्रथम माजी महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांचे पती देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे आज निधन (Devi Singh Shekhawat Passes Away) झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पुण्यातील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारामुळं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
आज सायंकाळी 6 वाजता पुण्यात होणार अंत्यसंस्कार
देवीसिंह रणसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आहेत. त्यांनी यापूर्वी अमरावतीचे माजी महापौर म्हणूनही काम केले होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य देखील होते. त्यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. देवीसिंह पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आल्यानं पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Deeply saddened by the demise of the Senior Congress leader and renowned agriculturist Shri Devisingh Ransingh Shekhawat ji. The veteran leader served as the first Mayor of Amaravati and was a strong support system for Smt Pratibha tai as the First Gentleman of India. pic.twitter.com/UUDgRL1U89
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 24, 2023
शरद पवार यांनी अर्पण केली श्रद्धांजली
देवीसिंह शेखावत यांच्या निधनावर विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करुन देवीसिंह शेखावत यांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रसिद्ध कृषितज्ज्ञ देवीसिंह रणसिंग शेखावतजी यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले. या दिग्गज नेत्याने अमरावतीचे पहिले महापौर म्हणून काम केले. प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या, त्यावेळी देवीसिंह शेखावत खंबीरपणाने त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याचे शरद पवार म्हणाले.
1965 मध्ये देवीसिंह शेखावत यांचा प्रतिभाताई पाटील यांच्याशी झाला होता विवाह
देवीसिंह शेखावत हे विद्याभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. ते कॉंग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्य होते. डॉ. शेखावत यांनी 1985 मध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. 1991 मध्ये ते अमरावतीचे प्रथम महापौर बनले होते. 1995 मध्येही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. अमरावतीचे महापौर ते आमदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापाक म्हणून काम पाहिलं होतं. दरम्यान, 7 जुलै 1965 रोजी डॉ. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभाताई पाटील यांचा विवाह झाला होता. ते नेक दशके ते अमरावतीच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तूळात कार्यरत होते. वयोमानामुळं देवीसिंह शेखावत यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर आज उपचारादरम्यान पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.