(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मुंबईतील 36 मतदार संघामध्ये अनेक माजी नगरसेवक यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. तसेच त्यानुसार त्यांनी कामकाज करायला देखील सुरुवात केलेली आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीची (Viddhan Sabha Election) तयारी सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी करताना पाहायला मिळतायत. यामध्ये मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील अनेक मतदारसंघातील माजी नगरसेवक महानगरपालिका निवडणुका लागत नाही त्यामुळे आता थेट विधानसभेची तयारी करत आबेक. आमदारकीसाठी माजी नगरसेवकांची मोर्चे बांधणी सुरू झालीय
विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे इच्छुक आहेत. यामध्ये मुंबईतील विधानसभा मतदार संघासाठी अनेक राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली इच्छा व्यक्त करणारे अर्ज आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. यात मुंबईतील 36 मतदारसंघामध्ये अनेक माजी नगरसेवक यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. तसेच त्यानुसार त्यांनी कामकाज करायला देखील सुरुवात केलेली आहे.
मुंबई महापालिकेचे 227 वॉर्ड
मुंबईतील 36 मतदार संघामध्ये मुंबई महापालिकेचे 227 वॉर्ड आहेत. गेल्या दोन वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक नाहीत. त्यामुळे माजी नगरसेवक आता थेट नगरसेवक पदाची तयारी करता करता आगामी विधानसभा निवडणुकीची देखील तयारी करतायत. यामध्ये मुंबईतील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांचा सहभाग आहे.
नगरसेवक आमदार होण्याची परंपरा
यापूर्वी देखील मुंबईतून अनेक नगरसेवक हे थेट आमदार आणि खासदार देखील झाले होते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या माजी नगरसेवकांना आमदारकीच्या स्वप्न पडू लागले आहे . आमदारकीसाठी इच्छुक नगरसेवकांची प्रत्येक मतदार संघात विविध कार्यक्रम घेत मोर्चेबांधणी देखील करायला सुरुवात केलीय.
हे माजी नगरसेवक आमदारकीची तयारी करत आहेत
मनोज जामसुतकर भायखला
रवी राजा
कचरू यादव
प्रभाकर शिंदे भांडुप
उपेंद्र सावंत विक्रोळी
नाना अंबोले
संजय तुर्डे – कालिना
विठ्ठल लोकरे – मानखुर्द शिवाजीनगर
श्रद्धा जाधव
संदीप देशपांडे
सुफीयान वनु
असे अनेक राजकीय पक्ष व अपक्ष माजी नगरसेवक मुंबई आमदारकीची तयारी करत आहेत.
2019 विधानसभेसाठी या नगरसेवकांनी प्रयत्न केला होता
- शिवसेना - रमेश कोरगावकर - भांडुप (प.) मतदारसंघ
- शिवसेना - दिलीप लांडे - चांदीवली मतदारसंघ
- शिवसेना - महापौर विश्वनाथ महाडेश्वर - वांद्रे (पूर्व) मतदारसंघ
- काँग्रेस - आसिफ झकेरीया - वांद्रे (प.) मतदारसंघ
- काँग्रेस- जगदिश अमीन कुट्टी - अंधेरी ( पूर्व) मतदारसंघ
- मनसे - संजय तुर्डे - कलिना मतदारसंघ
- समाजवादी पार्टी - रईस शेख - भिवंडी
- अखिल भारतीय सेना - गीता गवळी भायखळा
- भाजप - पराग शहा - घाटकोपर ( पूर्व)
राजुल पटेल या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या .मात्र वर्सोवा विधानसभा क्षेत्रातून त्या अपक्ष उमेदवार होते. सुफीयान वनु हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. ते मानखुर्द - शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार होते .या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या 10 विद्यमान नगरसेवकांनी आणि 10 माजी नगरसेवकांनीही अधिकृतपणे तर काहींनी बंडखोरी करून निवडणूक लढवली
मुंबईत नगरसेवकांनी आमदार बनण्याची परंपरा
2019 विधानसभा निवडणुकीत पालिकेच्या 4 नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली . शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर, दिलीप लांडे,भाजपचे नगरसेवक पराग शहा आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख या 4 नगरसेवकांनी बाजी मारली आणि आमदारकीची लॉटरी खिशात घातली.
कोणाचं स्वप्न पूर्ण होणार?
त्यामुळे या 2024 विधानसभा निवडणुकीत यंदा देखील माजी नगरसेवक जोरदार तयारी करत आहेत. आपल्या मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रम घेत मोर्चे बांधणी करत आहेत. त्यामुळे मुंबईतील नगरसेवकांची आमदार होण्याची परंपरा यंदा कोणते नगरसेवक पूर्ण करतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.