गडचिरोलीत पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक, सी-60 कमांडोंची कारवाई
गडचिरोली पोलिसाच्या सी 60 कमांडोंनी पाच नक्षलवाद्यांना अटक केली आहे. सी-60 कमांडोंनी नक्षलवाद्यांचा पाठलाग करुन ही कारवाई केली आहे.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मौजा पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवादी यांच्या झालेल्या चकमकीनंतर पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अबुजमाड जंगल परिसराचा भाग समजल्या जाणाऱ्या परिसरात गडचिरोली पोलीस दलाला अभूतपूर्व यश मिळालं आहे.
या नक्षलवाद्यांमध्ये दोन नक्षली कुटूल नक्षल दलमचे सदस्य आहेत, तर तीन जनमिलिशिया म्हणून कार्यरत आहेत. उपविभाग भामरागड हद्दीत येणाऱ्या उपपोलीस स्टेशन लाहेरीपासून अंदाजे 35 किमी अंतरावर असलेल्या आणि छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या मौजा पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. नक्षलवाद्यांनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ व प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला. यावेळी नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. सी-60 कमांडोंनी नक्षलवाद्यांचा पाठलाग केला आणि पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे
रैणू सोनू वड्डे (20 वर्ष) रा. पदमकोट ता. कोहकामेटा जि. नारायणपूर (छत्तीसगड) बंडू चक्कू वड्डे (25 वर्ष) रा. पदमकोट ता. कोहकामेटा जि. नारायणपूर सुखराम सोमा उसेंडी (40 वर्ष) रा. उसेवाडा, ता. कोहकामेटा जि. नारायणपूर दोघे इरपा उसेंडी (30 वर्षे) रा. उसेवाडा, ता. कोहकामेटा जि. नारायणपूर केये सायबी वड्डे (40 वर्षे) रा. पदमकोट ता. कोहकामेटा जि. नारायणपूर