(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra ST : संसाराबरोबर एसटीचा प्रवास सुरु, एसटी इतिहासातील सुवर्ण दिवस, महिला चालकांनी चालवली पहिली एसटी बस !
Maharashtra ST : राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एसटी महिला चालक रुजू झाल्या आहेत.
Maharashtra ST : आतापर्यंत महिला वर्ग रिक्षा, शाळेची बस किंवा इतर वाहने चालविताना आपण पाहिली पण राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एसटी चालक रुजू झाल्या आहेत. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या (Maharashtra ST) इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालकाने (ST Bus) बस चालवली आहे. राज्यातील अनेक भागात 206 महिला चालकांनी एसटी स्टिअरिंग हाती घेत नवा प्रवास सुरु केला आहे.
एसटीमध्ये सरळ सेवा भरती (Saral Seva Bharti) सन – 2019 अंतर्गत चालक तथा वाहक पदासाठी भरती झाली होती. आता महिला चालक कम वाहक पदाकरीता एकूण 206 महिला उमेदवारांची भरती झाली होती. या महिला चालकांना एक वर्षांचे अवजड वाहनाचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. आता महिलांना थेट कामावर रुजू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रुजू झालेल्या अनेक महिला चालकांनी एसटीचे स्टिअरिंग हाती घेत प्रवाशांना प्रवास घडविला आहे. एसटीच्या इतिहासात महत्वाचा दिवस असून महिला आता एसटीच्या ताफ्यातही आल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
एसटी महामंडळात महिलांनी कंडक्टर म्हणून अनेक वर्षांपासून जबाबदारी सांभाळली आहे. आता एसटी सारख्या अवजड वाहनाचे सारथ्य प्रथमच महिला चालक करत आहेत. राज्य परिवहनच्या सेवेत महिला चालक देखील रुजू झाल्या असून नुकत्याच माधवी संतोष साळवे यांनी ‘सिन्नर – नाशिक’ (Nashik-Sinner) मार्गावर एसटी बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. माधवी साळवे यांना पाहून सिन्नर (Sinnar) तालुक्यातील प्रवासी आश्चर्यचकीत त्यांचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन देत आहे. तर अर्चना अत्राम यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) या मार्गे बस चालवली आहे.
रुपाली चाकणकर यांची अभिनंदनपर पोस्ट
दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी देखील महिला एसटी चालकांचे कौतुक केले आहे. त्यांनी एका पोस्टद्वारे महिला चालकांचे अभिनंदन केले आहे. रुपाली चाकणकर लिहतात कि, "नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची...आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा.अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! " अशा आशयाची पोस्ट चाकणकर यांनी केली आहे.
एसटी महामंडळाचे धाडसी पाऊल ...
महिलांची बस चालक तथा वाहक पदी भरती करण्याच्या दृष्टीने त्यांना अनुभव तसेच उंचीच्या अटीमध्ये काही सूट देण्यात आल्या होत्या. तर आदिवासी भागातील महिलांना देखील संधी देण्यात आली आहे. यात सुरुवातीला आधी हलकं वाहन चालवण्याचा प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर अवजड वाहनांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर यातील काही महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना एसटी चालकांचे प्रशिक्षण देऊन महामंडळाने त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे. हा प्रयोग देशभरातील महिला मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितलं जात आहे. महिलांना एसटी बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे पाऊल टाकला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.