जालना जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत, पावसानं दडी मारल्यामुळं हंगाम हातून जाण्याची धास्ती
जालना जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असून पावसानं दडी मारल्यामुळं हा हंगाम हातून जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे. पीक वाचवण्यासाठी हाताने पाणी घालून पीक जगवायची केविलवाणी धडपड शेतकरी करताना दिसत आहेत.
जालना : जालना जिल्ह्यात पावसानं दडी मारली असून परिणामी पेरणी वाया जाऊन हंगाम हातातून जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटू लागलीय, जूनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. सुरुवातीच्या समाधानकारक पावसानं पीक जमीनीच्यावर आल्यानं पेरणी साधल्याचा आनंद शेतकऱ्यांना होत होता. आज मात्र परिस्थिती पावसाअभावी चिंताजनक बनली असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात तुरळक भाग वगळता 20 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडलाय, खरीप पेरणीत कापूस आणि सोयाबीन मुख्य पीकलागवड असलेल्या बदनापूर, अंबड, घनसावंगी, मंठा परतूर भागांत कापूस आणि सोयाबीनचं पीक करपू लागलंय.
घनसावंगी आणि भोकरदन तालुक्यात शेतकरी पीक वाचवण्यासाठी हाताने पाणी घालून पीक जगवायची केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत. घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील शेतकरी परमेश्वर जगताप आणि कैलास खरात हे गेल्या 5 दिवसांपासून शेतातील कापसाला परिवारासह पाणी घालत आहेत.
कैलास खरात यांचा चार एकर कापूस आहे. एबीपी माझाला बोलताना सांगितले की "आता जास्त काळ पावसाची उघडीप धोक्याची आहे. आमच्या परिसरात जुलैच्या 15 तारखेनंतर ठिपका देखील पडला नाही, सध्या दिवसभर घरातील मुलाबाळांसह कापसाला हातानं पाणी घालण्याचा दिनक्रम सुरु आहे. परिस्थिती अशीच राहिली तर हा हंगाम हाती लागत नाही.", अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
अशाच्या परिस्थितीबाबत सांगताना परमेश्वर जगताप मात्र अजून पावसाच्या आशेवर आहेत. गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण पाहता, पाऊस बरसेल अशी त्यांना आशा आहे. मात्र पीकं पिवळी पडत असून कापसापेक्षा सोयाबीनचं नुकसान यामुळे होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
जालना जिल्ह्यात आजवर सरासरी 80.24 टक्के पाऊस झालाय, जिल्ह्यातील तालुका निहाय आकडेवारी :
जिल्हा | सरासरी पाऊस |
जालना | 465.30 मिमी |
बदनापूर | 467.80 मिमी |
भोकरदन | 359.90 मिमी |
जाफराबाद | 420.90 मिमी |
परतूर | 538.70 मिमी |
मंठा | 561.40 मिमी |
अंबड | 497.50 मिमी |
घनसावंगी | 546.47 मिमी |