Farmer Protest | शरद पवारांचा सचिनला मोलाचा सल्ला, 'आपलं क्षेत्र सोडून बोलताना...'
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. जो शेतकरी आपल्याला अन्न धान्य पुरवतो त्याच्याबद्दल असं बोलणं सुसंस्कृत पणाचे लक्षण नाही
Farmer Protest जवळपास मागील दोन महिन्यांहून अधिक दिवसांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर देशविदेशातील सेलिब्रिटींनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. पण, यामध्ये वादाची ठिकणगीही पडली. पॉप गायिका रिहानानंही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, ज्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं ट्विट करत भारतीयच भारताबद्दल कोणतीही गोष्ट ठरवू शकतात असं म्हणत कोणा बाह्य शक्तींनी यात सहभाग दर्शवू नये अशा आशयाचं एक ट्विट केलं होतं.
सचिनच्या या ट्विटनं अनेकांच्याच भुवया उंचावल्या. काहींनी त्याला थेट धारेवर धरलं. सचिनवर निशाणा साधणाऱ्यांमध्ये आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही समावेश झाला आहे. कारण, सदर ट्विटबाबत सचिनला त्यांनी एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
भारतातील सेलिब्रेटींनी जी भुमिका घेतली त्याबद्दल सामान्य लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान, संरक्षणमंत्री किंवा गडकरींनी पुढे यावं
'माझ्या मते शेतकरी आंदोलनात तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज. त्यासाठी कोणीतरी सिनियर मंत्री बोलणीसाठी हवा. स्वतः पंतप्रधान, संरक्षणमंत्री किंवा गडकरींसारखे मंत्री पुढं आले तर यात तोडगा मार्ग निघण्याची शक्यता आहे', असं शरद पवार म्हणाले.
रस्त्यावर खिळे ठोकण्यापर्यंतची टोकाची भूमिका देशात कधीही घेतली नव्हती
रस्त्यावर खिळे ठोकण्याची घटना पाहता स्वातंत्र्य्यानंतर अशा प्रकारची अती टोकाची भूमिका कधीही देशात घेतली गेली नव्हती. त्यातून सरकारचा दृष्टिकोन दिसुन येतो. पण अन्नदाता जेव्हा अशाप्रकारे रस्त्यावर बसतो तेव्हा त्याबद्दल सामंजस्य दाखवण्याची गरज आहे, असं म्हणत मला कोणी मध्यस्थी करायला सांगितलेलं नाही अथवा मी मध्यस्थी कशाला करावी असं कोणी सुचवलेलंही नाही ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या; 'ते तिथं गेले आणि....'
एवढे दिवस कष्टकरी वर्ग थंडी पाण्याच्या विचार न करता रस्त्यावर बसला आहे. याचा अर्थ त्याच्याबद्दल सहानुभूती देशात आहे आणि देशाच्या बाहेरही त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त व्हायला लागलीये हे फारसं चांगलं नाही. आपल्या राज्यकर्त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. हे सगळं का घडलं तर पंतप्रधानांनी मागे अमेरिकेत असताना मोदी- ट्रंप अशा घोषणा केली. त्याच स्वागत काही घटकांनी केलं. आता तशाच प्रकारची प्रतिक्रीया आज परदेशात पहायला मिळतेय यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.
सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पवारांनी भाजपवर तोफ डागली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. जो शेतकरी आपल्याला अन्न धान्य पुरवतो त्याच्याबद्दल असं बोलणं सुसंस्कृत पणाचे लक्षण नाही असं म्हणत त्यांनी केंद्राचे कान टोचले.