शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते, सचिनला दिलेल्या सल्ल्यावरुन सदाभाऊ खोत यांचा निशाणा
'ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं', असा सल्ला शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला दिला होता. त्यावरुन सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. 'शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते', असं खोत म्हणाले.
सातारा : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्वीट करणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं' असं वक्तव्य केलं होतं. यावर रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते, असं सदाभाऊ खोत म्हणाले. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत बोलत होते.
पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, ज्यावर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीयच भारताबद्दल कोणतीही गोष्ट ठरवू शकतात असं म्हणत कोणा बाह्य शक्तींनी यात सहभाग दर्शवू नये, अशा आशयाचं ट्वीट केलं होतं.
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants. Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
सचिनच्या या ट्वीटने अनेकांच्याच भुवया उंचावल्या. काहींनी त्याला थेट धारेवर धरलं. सचिनवर निशाणा साधणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही समावेश होता. या ट्वीटबाबत सचिनला त्यांनी सल्ला दिला होता.
काय म्हणाले होते शरद पवार? भारतातील सेलिब्रेटींनी जी भूमिका घेतली त्याबद्दल सामान्य लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहिल, असं शरद पवार म्हणाले होते.
सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा शरद पवार यांना लक्ष्य करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, "शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे."