Pune News : शेवटी पुणेकरच! ना फ्लाईट, ना ट्रेन, मराठमोळ्या सोनावणे कुटुंबियांचा 'पुणे टू लंडन' प्रवास थेट कारमधून...
पुण्यातील सोनावणे कुटुंब 32 देशांचा प्रवास थेट कारमधून करणार आहे. 120 दिवसांचा हा प्रवास असणार आहे.
पुणे : पुणेकर काय करतील? याचा नेम नाही. तुम्ही दुसऱ्या देशात जाण्यासाठी हवाई किंवा समुद्रमार्गने प्रवास करून जाऊ शकता. मात्र पुण्यातील एक कुटुंब कारने जगातील 32 देशांमध्ये प्रवास करणार आहे, असं सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही मात्र पुण्यात राहणाऱ्या एका कुटुंबाने थेट आपल्या Range Rover कारने लंडनपर्यंतचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेक सोनवणे हे आपल्या कुटुंबासोबत हा प्रवास करणार आहे. 32 देश पार करत ते लंडन प्रवास पूर्ण करणार आहेत. याशिवाय वसुधैव कुटुंबकम म्हणजे विश्व हे एक कुटुंब आहे, हा संदेश देत ते प्रत्येक देशात जाणार आहे.
सर्व परवानग्या अन् पाच देशांचा व्हिसा
32 देशात भारताच्या संस्कृतीचे दर्शन ते या माध्यमातून घडवणार आहेत. आज त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. त्यांना आज लोणावळा येथील नागरिकांनी झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेछा दिल्या आहेत. या प्रवासासाठी त्यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या आहेत. त्यात त्यांना पाच देशाचा व्हिसा मिळालेला असून 30 हजार किमीचा त्यांचा प्रवास असणार आहे.
कसा असेल प्रवास?
ते यातून दुबई, इराण, तुर्की, बल्गेरिया, डेन्मार्क, जर्मनी, स्विझरलँड, इटली, फ्रान्स आणि लंडन असा प्रवास ते करणार आहेत. या दरम्यान त्यांचा तीन वेळा बोटीतून आणि एकदा समुद्राखालून जाणाऱ्या बोटीतून ते प्रवास करणार आहेत. देशाला आणि शहरवासीयांना अभिमान वाटावा असा त्यांचा प्रवास असणार आहे. हा त्यांचा 120 दिवसांचा प्रवास असणार असून 32 देशांतून ते हा प्रवास करणार आहेत. असा प्रवास करणारे ते भारतातील पहिले मराठी कुटुंब असणार आहे.
सहा महिन्यांपासून तयारी सुरु...
या प्रवासासाठी मागील सहा महिन्यांपासून या आम्ही तयारी करत आहोत. त्यात प्रत्येक देशाच्या परवानग्या, गाडीच्या परवानग्या आणि गाडीचा व्हिसा या महत्वाच्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या परवानग्या मिळाल्यावर आम्ही जाण्याची तारीख पक्की केली. 32 देशातील दुतावासांची भेट घेणार आहोत आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार, प्रचार करणार आहोत. सोबतच प्रत्येक देशातील संस्कृतीदेखील समजून घेण्य़ाचा प्रयत्न करणार आहोत, असं विवेक सोनवणे यांनी सांगितलं आहे.