अभ्युदय बँकेबाबत व्हायरल होणारा संदेश खोटा, बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांची 'माझा'ला माहिती
अभ्युदय बँक पूर्णपणे सुरक्षित आहे. बँकेमध्ये कसल्याही प्रकारची अडचण नसून बँकेतील सर्व व्यवहार सुरळीत असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
मुंबई : मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमांत अभ्युदय बँक अडचणी आली आहे. अशी माहिती मोठया प्रमाणात व्हायरल झाली आहे. या माहितीमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, बँकेच्या ऑडीटरने ही माहिती दिली आहे. यामध्ये अभ्युदय बँक आणि एनकेजीएसबी बँक अडचणीत आहे असं नमूद करण्यात आलं आहे. समाज माध्यमांमध्ये फिरणारी ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. अभ्युदय बँक पूर्णपणे सुरक्षित आहे. बँकेमध्ये कसल्याही प्रकारची अडचण नसून बँकेतील सर्व व्यवहार सुरळीत असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
अर्थ स्थितीवरुन समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या तर्कवितर्कांबाबत अभ्युदय बँकेतील ठेवीदारांनी संयम ठेवावा. त्याचबरोबर समाजमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या सहकारी बँकेच्या अर्थ स्थितीबाबत चिंता करण्याचं कारण नाही. अफवा पसरवणाऱ्या अज्ञातांविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला देखील तक्रार दिली आहे. राज्यातील सहकारी बँकांबाबत समाजमाध्यमातून काही दिवसांपासून चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. परंतू सध्या अशी परिस्थिती नाही. ठेवीदारांनी याबाबत चिंता करु नये, असे घनदाट म्हणाले.
याबाबत बोलताना बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनवट म्हणाले की, मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांत बँकेबाबत जाणीवपूर्वक चुकीचे संदेश फिरवण्यात येत आहेत. यामध्ये बँक अडचणीत आल्याचं देखील सांगण्यात येतं आहे. ठेवीदारांनी यावर अजिबात विश्वास ठेऊ नये. याबाबत रिझर्व्ह बँकेला देखील बँकेच्या वतीने बँक सुस्थितीत असल्याचं कळवण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून याबाबत मला हजारो फोन येतं आहेत. मी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे.अभ्युदय बँक 1964 पासून कार्यरत आहे. बँकेच्या तीन राज्यांच्या मिळून तब्बल 111 शाखा आहेत. सर्व शाखातील व्यवहार सध्या व्यवस्थित सुरू आहेत. देशातील अग्रगण्य सहकारी बँकांमध्ये गणना होणाऱ्या अभ्युदय बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून बँकेबाबतच्या तथ्यहीन अफवांवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये.
याबाबत बोलताना बँकेचे व्यवस्थापकिय संचालक प्रेमनाथ एस सालियन म्हणाले कि, बँकेच्या ठेवीदार खातेदारांनी अशा अपप्रचाराकडे दुर्लक्ष करावं. बँकेतील सर्व ठेवी सुरक्षित आहेत. बँकेच्या 3 राज्यांत मिळून तब्बल 111 शाखा आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या निकषांपेक्षा अधिक आहे. बँकेबाबत काही उपद्रवी व्यक्ती नाहक खोटी माहिती पसरवत असून याबाबतची तक्रार बँकेने पोलिसांमध्ये केली आहे. सध्या अनेक बँकांबाबत अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात येतं आहेत. परंतु नागरिकांनी अशा बाबींकडे लक्ष देऊ नये. नागरिकांना काहीही अडचण वाटल्यास नागरिकांनी आपल्या शेजारच्या अभ्युदय बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. त्यांच्या शंकांचं समाधान बँकेकडून करण्यात येईल